Monica Rajale - Spark of power struggle between Prabhavati Dhakne | Sarkarnama

मोनिका राजळे - प्रभावती ढाकणे यांच्यात सत्तासंघर्षाची ठिणगी

राजेंद्र सावंत
सोमवार, 22 जून 2020

प्रभावती ढाकणे यांनी मोनिका राजळे यांच्यावर मागील महिन्यात पिण्याचे पाण्याचे टँकर मंजुरीच्या विषयावरुन कडक शब्दात टीका केली होती. प्रभावती ढाकणे आक्रमक होत असून, त्यांच्यात व राजळे यांच्यातच सत्ता संघर्ष पेटणार असल्याचे बोलले जाते.

पाथर्डी : भारतीय जनता पक्षाच्या आमदार मोनिका राजळे व राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे यांनी रविवारी पाथर्डी शहरात पक्षाचे जाहीर कार्यक्रम घेतले. निमित्त काहीही असले, तरी पक्ष संघटना मजबुत करणे, हाच उद्देश दोन्ही महिला नेत्यांचा राहिला आहे. सत्ता असताना व सत्ता नसतानाही पक्षाच्या संघटनेला महत्व देण्याचे काम दोन्ही महिला नेत्या करीत आहेत.

आगामी काळात ढाकणे - राजळे हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातुन व्यक्त होत आहे. रविवारी राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने पक्षाच्या कार्यालयात प्रभावती ढाकणे यांच्या हस्ते तालुक्यातील कोरोना साथ रोगाच्या विषयी कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा ''मर्दानी महाराष्ट्र'' हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या. 

रविवारी आमदार मोनिका राजळे यांनी त्यांच्या व्हाईट हाऊस येथील पक्ष कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी व्हर्च्युअल कॉन्फरन्सद्वारे सवांद साधला. या वेळी पक्षाच्या केंद्रातील सरकारने राबविलेल्या जनहिताच्या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन राजळे यांनी कार्यकर्त्यांना केले. 

राजळे व ढाकणे यांनी पक्षसंघटना मजबुत करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कोरोना रोगाच्या धग आता कमी होताना दिसत आहे. आता कोरोनाचे कारण न सांगता पक्षासाठी काम करण्याची गरज असल्याचे दोन्ही महिला नेत्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. प्रभावती ढाकणे यांनी मोनिका राजळे यांच्यावर मागील महिन्यात पिण्याचे पाण्याचे टँकर मंजुरीच्या विषयावरुन कडक शब्दात टीका केली होती. प्रभावती ढाकणे आक्रमक होत असून, त्यांच्यात व राजळे यांच्यातच सत्ता संघर्ष पेटणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. ढाकणे -राजळे यांचा दुसऱ्या पिढीतील हा महिला नेत्यांमधील संघर्ष चांगलाच गाजेल, असा राजकीय धुरिणांचा अंदाज आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना महाआघाडीची सत्ता असल्याने ढाकणे यांना सत्तेचे राजकीय बळ मिळत आहे. जिल्हा परिषद व राज्य सरकारच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्याच्या विकासासाठी निधी खेचुन आणण्याची ढाकणे यांना कसरत करावी लागणार आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख