अंधःश्रद्धेतून मंदिराच्या पायात पुरले 1890 ग्रॅम सोने ! न्यायाधिशासह विश्वस्तांवर गुन्हा - mohatadevi news, 1890 grams gold buried foot of the temple. superstition! Crimes against trustees, including judges | Politics Marathi News - Sarkarnama

अंधःश्रद्धेतून मंदिराच्या पायात पुरले 1890 ग्रॅम सोने ! न्यायाधिशासह विश्वस्तांवर गुन्हा

राजेंद्र सावंत
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

एका जागृत विश्वस्तांमुळे याचे बिंग फुटले. विशेष म्हणजे संबंधित मंदिराचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधिशांसह इतर विश्वस्तांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पाथर्डी : अंधःश्रद्धेतून राज्यात अनेक घटना घडत असतात. नरबळी, एखाद्याला वाळीत टाकणे, भूत काढण्याच्या निमित्ताने एखाद्याला जबर मारणे असे प्रकार घडत असतात. नगर जिल्ह्यात मात्र वेगळाच प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रात प्रसिद्धी असलेल्या देवीच्या मंदिराच्या पायात तब्बल 1890 ग्रॅम सोन्याचे यंत्रे बनवून ते पुरण्यात आले.

सोने पुरल्यानंतर सकारात्मक ऊर्जा तेथे येते, त्यामुळे ते सोने पुरल्याची चर्चा आहे. एका जागृत विश्वस्तांमुळे याचे बिंग फुटले. विशेष म्हणजे संबंधित मंदिराचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधिशांसह इतर विश्वस्तांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी हे मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे. लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी मंदिरात येतात. मोहटा गडावर गेल्या काही वर्षांपासून भव्य-दिव्य अशा मंदिराचे बांधकाम झाले. शासनाच्या विशेष निधीतून हे बांधकाम झाल्याने नगर जिल्ह्याच्या वैभवात भर पडली आहे. अशा या प्रसिद्ध मंदिराच्या बाबतीत झालेला हा प्रकार राज्यात अंधःश्रद्धेचा कळसच म्हणावा लागेल.

मोहटादेवी मंदिर बांधताना पायात सोने पुरल्याप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष जिल्हा न्यायाधिश नागेश बी. न्हावळकर, विश्वस्त व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सहा पदाधिकाऱ्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार एक जानेवारी 2010 ते 31 डिसेंबर 2011 या काळात मोहटा देवीचे मंदिर बांधताना, त्याच्या पायात 1890 ग्रॅम सोने पुरले.

सुवर्णयंत्रे बनविण्यासाठी मजुरीपोटी 24 लाख 85 हजार रुपये दिले. हे सर्व अंधश्रद्धेतून केले. तत्कालीन विश्वस्त नामदेव गरड यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. खंडपीठाने याबाबत गुन्हे दाखल करण्याचा आदेश नुकताच दिला. 

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, बाबा आरगडे, ऍड. रंजना गवांदे, प्रकाश गरड, अर्जुन हरेल, प्रमोद भारुळे यांच्या तक्रारीवरुन पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

या प्रकरणाची महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात येऊ नये, यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उचलून धरीत थेट न्यायालयात नेले. विशेष म्हणजे या प्रकरणात जिल्हा न्यायाधिशावरच गुन्हा दाखल झाला आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख