`मोदी-योगी हाय हाय`, नगरमध्ये काॅंग्रेसची जोरदार घोषणाबाजी

मार्केट यार्डमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करत निदर्शने केली.
kiran kale.png
kiran kale.png

नगर : उत्तर प्रदेशात हाथरसमध्ये सामुहिक बलात्काराची बळी ठरलेल्या पिडीत युवतीला न्याय मिळावा, शेतकरी, कामगार विरोधी कायद्यांत बदल करावा, या मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज येथे आंदोलन केले. `मोदी-योगी हाय हाय` या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज शेतकरी, कामगार बचाव दिवस पाळण्यात आला. यानिमित्त मार्केट यार्डमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करत निदर्शने केली.

राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याबरोबर करण्यात आलेली गैरवर्तणूक, तसेच राहुल गांधी यांना केलेली धक्काबुक्की याचा तीव्र निषेध करणाऱ्या सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. मोदी - योगी सरकारच्या हिटलरशाही वृत्तीचा या वेळी तीव्र निषेध करण्यात आला. 

या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोदी सरकार मुठभर भांडवलदारांच्या पाठिशी

केंद्रातील मोदी सरकार हे मुठभर भांडवलदारांच्या पाठिशी आहे. मोदी सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेले कायदे हे या घटकांना देशोधडीला लावणारे असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे अहमदनगर शहर जिल्हा निरीक्षक डॉ. अनिल भामरे यांनी केला आहे.

गट व गणनिहाय आंदोलन करणार 

या वेळी प्रताप पाटील शेळके म्हणाले, की या आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवत नेणार आहोत. आगामी काळात जिल्हा परिषद गट, त्याचबरोबर पंचायत समिती गण स्तरावरती शेतकरी रस्त्यावर उतरून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करतील.

हे तर शेतकऱ्यांचे शोषण

शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समित्यांना संपवून टाकण्याचे षड्यंत्र केंद्र सरकारने चालवले आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्यासाठीची यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजास्तव या देशातील भांडवलदार शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कवडीमोल किमतीने माल विकत घेवुन मजबुरीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांचे शोषण करतील. कामगार विरोधी कायद्यामुळे भांडवलशाही राज्य या देशात येताना दिसते आहे. ही हिटलरशाही आहे. याविरुद्ध काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहर आणि जिल्ह्यामध्ये आक्रमकपणे याला विरोध करत आहे. 

काँग्रेस कार्यकर्त्याचे प्रतिकात्मक मुंडन

या वेळी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे अन्वर सय्यद यांनी मोदी - योगी सरकारच्या निषेधार्थ मुंडन केले. या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या, त्याचबरोबर शेतकरी, कामगारांच्या तीव्र भावना सरकारच्या नजरेत आणून देण्याचे काम करण्यात आले.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com