नगर : शहर व जिल्ह्यातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची मनमानी पुन्हा सुरु झाली असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट, ऑनलाईन शिक्षणापासुन वंचित ठेवण्याचे प्रकार काही शाळांमध्ये जिल्ह्यात सुरु झाले आहेत. फी भरली नाही, तर विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेतली जात नाही. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे काही विद्यार्थी व पालकांनी तक्रारी केल्या आहेत. असे आढळल्यास संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना काळे फासण्यात येईल, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांना निवेदने देण्यात आली आहेत.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की सहा महिने पूर्ण होऊन गेले असून, शाळांमध्ये 3 री ते 10 पर्यंत फक्त ऑनलाईन शिक्षण चालू आहे. शाळा संपूर्ण फी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकत आहेत. सध्या शाळेत कुठल्याही प्रकारचे संगणक प्रशिक्षण चालू नाही. शाळेतील कुठलीही स्टेशनरी वापरली जात नाही, कुठलीही बस सुरू नाही. स्नेहसंमेलनाचे कार्यक्रमाचे आयोजन नाही, कुठलेही खेळाचे सराव, स्पर्धांचे आयोजन सुरु नसताना शाळा मात्र पालकांना संपूर्ण फी भरण्याची सक्ती करीत आहेत. फी भरली नाही, तर प्रथम सत्राच्या परीक्षेतून विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचे प्रकार सुरू आहेत. विद्यार्थ्यांना संबंधित सोशल मीडियाच्या ग्रुपमधून काढून टाकण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची लिंक पाठविली जात नाही. असे प्रकार लक्षात आल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना काळे फासण्यात येईल.
संगणक प्रशिक्षण, स्टेशनरी, बस, स्नेहसंमेलने, प्रयोगशाळा, खेळ आदींची फी रद्द करून केवळ आॅनलाईन प्रशिक्षणाचीच फी आकारणे संयुक्तीक आहे. त्यामुळे दरवर्षीच्या फीममध्ये कपात करावी. तसे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना द्यावेत, अशी मागणी मनसेच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे.
उद्या शिक्षणाधिकाऱ्यांशी बैठक
दरम्यान, इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी फीमध्ये सवलत द्यावी, तसे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना द्यावेत, या मागणीसाठी उद्या मनसेचे कार्यकर्ते व शिक्षणाधिकारी यांच्याशी बैठक होणार असल्याचे नितीन भुतारे यांनी सांगितले.

