MLA Vikhe Patil's eye on Sugar Workers Hospital | Sarkarnama

साखर कामगार रुग्णालयावर आमदार विखे पाटील यांचा डोळा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 30 मे 2020

आज दुपारी आमदार विखे पाटील यांनीही साखर कामगार रुग्णालयाची पाहणी करून माहिती घेतली. त्यामुळे काही तरी शिजत असल्याचा संशय आहे.

श्रीरामपूर : ""कामगार नेते गंगाधर ओगले यांनी गोरगरीब जनतेसाठी येथे साखर कामगार रुग्णालयाची उभारणी केली. रुग्णालयाच्या उभारणीत साखर कामगारांचाही त्याग आहे. या रुग्णालयावर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा डोळा असून, रुग्णालयाचा ताबा अथवा कारभारात ते हस्तक्षेप करणार असतील, तर सर्व विश्वस्तांचा त्यास पूर्णपणे विरोध राहील,'' असे विश्वस्त भीमराज देवकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

आमदार विखे पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी शहरातील संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी श्रीरामपूरच्या रुग्णांना लोणी किंवा विळद घाट येथे जाण्याची गरज नाही, तर साखर कामगार रुग्णालयात आम्ही लक्ष घालू. त्याबाबत आपटे व डॉ. रवींद्र जगधने यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्याचे म्हटले होते. त्या वेळी आम्ही दुर्लक्ष केले. परंतु त्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी येथे येऊन माहिती घेतली. दोन दिवसांपूर्वी आमदार विखे पाटील यांचे सिव्हिल इंजिनिअर येऊन रुग्णालयाची इमारत व परिसराची मोजमापे घेऊन गेले. अन्य डॉक्‍टरांनीही येऊन माहिती घेतली.

आज दुपारी आमदार विखे पाटील यांनीही साखर कामगार रुग्णालयाची पाहणी करून माहिती घेतली. त्यामुळे काही तरी शिजत असल्याचा संशय आहे. कामगार नेते अविनाश आपटे व ज्ञानदेव आहेर रुग्णालयाचा कारभार चांगल्या प्रकारे पाहत असल्याने आम्ही त्यात ढवळाढवळ करत नाही, असे देवकर म्हणाले. 

रुग्णालयाचे धोरण ठरविण्याचा अधिकार विश्वस्त मंडळाला आहे. रुग्णालयाचे विश्वस्त म्हणून याची आम्हाला कोणतीही कल्पना नाही. कामगारांच्या पैशातून रुग्णालय उभे राहिल्याचे आपण साक्षीदार आहोत. स्व. जयंत ससाणे व स्व. गोविंदराव आदिक वगळता रुग्णालयासाठी कोणत्याही साखर कारखान्याने आर्थिक मदत केली नाही. सन 1987 मध्ये संस्थापक गंगाधर ओगले यांच्या व्यवस्थापन काळात रुग्णालय बंद पडले. त्या वेळी ते नगरपालिकेला चालविण्यास देण्याचा ठराव झाला. त्यास आम्ही संघटनेमार्फत विरोध करून मुख्य धर्मादाय आयुक्तांकडून (मुंबई) स्थगिती हुकूम मिळवला. तीन वर्षे बंद असलेले रुग्णालय विश्वस्त मंडळाने स्वतः चालवावे, असा आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिला. आपटे, आहेर, महाराष्ट्र आरोग्य मंडळ (पुणे) यांचे प्रमुख व विश्वस्त डॉ. दादा गुजर यांनी स्वत: पुढाकार घेऊन ते सुरू केले. कामगार संघटनेने उभारलेले आशिया खंडातील हे एकमेव रुग्णालय असून, स्वतःच्या कुवतीने ते व्यवस्थित चालत असल्याचे देवकर म्हणाले. 

विश्वस्त मंडळाने निर्णय घेतला तरच... ः विखे 

आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ""याबाबत साखर कामगार रुग्णालयाशी संबंधित लोकांची मागणी होती. त्यामुळे एकत्र काम करू, या भूमिकेतून तेथे काय केले पाहिजे, कसे केले पाहिजे, सध्याची वस्तुस्थिती काय आहे, याची आपण माहिती घेत आहोत. त्यासंबंधी विश्वस्त मंडळासोबत चर्चा सुरू आहे. विश्वस्त मंडळाने निर्णय घेतला, तरच पुढे जाता येईल. त्यामुळे रुग्णालयात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. देवकर हे अशोक साखर कारखान्याच्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून तेथे विश्वस्त आहेत. त्यांच्याप्रमाणे इतर कारखान्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्यही विश्वस्त आहेत. विश्वस्त मंडळाशी चर्चा करून त्यांनी निर्णय घेतला, तरच पुढे जाता येईल.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख