आमदार लंकेंचा बिनविरोधचा षटकार ! आणखी तीन ग्रामपंचायतींची घोषणा - MLA Sri Lanka's unopposed six! Announcement of three more Gram Panchayats | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार लंकेंचा बिनविरोधचा षटकार ! आणखी तीन ग्रामपंचायतींची घोषणा

मुरलीधर कराळे
मंगळवार, 22 डिसेंबर 2020
ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी विडाच उचलला आहे. मतदारसंघातील ५० ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे नियोजन केले असून, त्यानुसार आतापर्यंत ६ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोधची घोषणा करण्यात आली आहे.

नगर : ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी विडाच उचलला आहे. मतदारसंघातील ५० ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे नियोजन केले असून, त्यानुसार आतापर्यंत ६ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोधची घोषणा करण्यात आली आहे.

आमदार लंके यांनी बिनविरोध निवड होणाऱ्या ग्रामपंचायतींना २५ लाखांचे बक्षिस जाहीर केले. त्यानंतर त्यांनी निवडणुका होणार असलेले गावे पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. संबंधित गावात बैठका घेऊन कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वात आधी राळेगणसिद्धी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर लगेचच पानोली व कारेगाव ही गावे बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.

आज पारनेर तालुक्‍यातील शिरापूर, सारोळा अडवाई, भांडगाव या तिन ग्रामपचायतींबाबत बैठक झाली. या तीनही ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे जाहीर करण्यात आले.

शिरापूर सहाव्यांदा बिनविरोध

शिरापूर येथे ग्रामपंचायत व सेवा सोसायटीची निवडणूक सलग सहाव्यांदा बिनविरोध झाली. जिल्हा परिषदेचे कृषी व पशूसंर्वधन समितीचे माजी सभापती मधुकर उचाळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या बैठकीत ग्रामपंचायत व सेवा सोसायटीच्या सदस्यांची एकमताने निवड करताना आमदार नीलेश लंके यांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिला. बिनविरोध निवडलेले सदस्य- रखमा बाबूराव उचाळे, हनुमंत शंकर भोसले, संतोष पांडुरंग नरसाळे, अस्मिता मधुकर उचाळे, जान्हवी भास्कर उचाळे, जयश्री सोमनाथ वडणे, लीलाबाई पांडुरंग शिनारे, किरण सचिन खामकर, कैलास पोपट उचाळे, ललिता नवनाथ चाटे.

हिवरेबाजारचा आदर्शघेत सारोळा अडवाईची वाटचाल

आदर्शगाव हिवरे बाजारचा आदर्श घेत सारोळा अडवाई गावाने वाटचाल सुरू केली आहे. गावातील एकोपा टिकून राहावा, यासाठी आमदार नीलेश लंके यांनी केलेल्या बिनविरोध ग्रामपंचायतीच्या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळाला. माजी सरपंच देविदास आबुज, दत्तात्रेय महांडुळे, बबन फंड, परशूराम फंड, रमेश आबुज, शंकर महांडुळे, सतीश महांडुळे आदी उपस्थित झालेल्या बैठकित गाव बिनविरोध करण्याचे नियोजन करण्यात आले. सारोळा अडवाई येथील ग्रामस्थांनी कोणतीही खलबते न करता, अवघ्या दोन मिनिटांत सदस्यांची निवड करीत एकोपा दाखवून दिला. देवीदास अबूज ग्रामस्थांची भूमिका सांगून आगामी काळात गावाच्या विकासालाच प्राधान्य देणार असून, सर्वांना बरोबर घेऊन आमदार लंके यांच्या नेतृत्त्वाखाली कामे करणार असल्याचे सांगितले. आमदार लंके यांनी ग्रामस्थांचे काैतुक करून दाखविलेली तत्परता कौतुकास्पद असून, निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने मुळा धरणावरून पाणीयोजना राबवून महिलांच्या डोक्‍यावरील हंडा कायमस्वरूपी उतरविणार आहे, असे सांगितले.
दरम्यान, भांडगाव येथील ग्रामस्थांनीही बिनविरोध निवडणुकीवर शिक्कामोर्तब केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, सुरेश धुरपते, दत्तात्रेय खरमाळे आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख