MLA Sangram Jagtap remembered Dindi and prayed | Sarkarnama

आमदार संग्राम जगताप यांनी जागविल्या दिंडीच्या आठवणी अन केली ही प्रार्थना

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 जुलै 2020

या वर्षी कोरोनामुळे जगताप कुटुंबियांची दिंडी जाणार नाही, परंतु वारकऱ्यांनी घरीच राहून विठ्ठलाची पूजा करावी. देशावरील, राज्यावरील हे कोरोनाचे संकट टळून पन्हा वारीची परंपरा पूर्ववत चालू होण्यासाठी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करावी, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.

नगर : दरवर्षी आमच्या कुटुंबातून दिंडी पंढरीकडे जाते. माझे मोठे बंदू सचिनभाऊ दिंडित पायी चालत असतात. या वारीचे संपूर्ण नियोजन ते स्वतः लक्ष घालून करतात. त्यामुळे पंढरपूर वारी हा माझ्यासाठी सर्वांत सुंदर आनंद सोहळा आहे, अशा आठवणी आज आषाढी एकादशिनिमित्त आमदार संग्राम जगताप यांनी जागविल्या.

सोशल मीडियावरून त्यांनी या वर्षी कोरोनामुळे जगताप कुटुंबियांची दिंडी जाणार नाही, परंतु वारकऱ्यांनी घरीच राहून विठ्ठलाची पूजा करावी. देशावरील, राज्यावरील हे कोरोनाचे संकट टळून पन्हा वारीची परंपरा पूर्ववत चालू होण्यासाठी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करावी, असे आवाहन केले आहे.

जगताप कुटुंबियांच्या वतीने दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला दिंडी जाते. अनेक भाविक या दिंडीत सहभागी होतात. दिंडीची परंपरा त्यांच्या आजोबांपासून सुरू आहे. मागील वर्षी स्वतः जगताप पायी चालत पंढरपूरला गेले. या वर्षी कोरोनामुळे मात्र ही परंपरा खंडीत झाली. दिंडीत जाता येणार नसल्याने महाराष्ट्रात सर्व वारकऱ्यांनी आपापल्या गावी थांबून विठ्ठलाची पूजा केली.

गावातील मंदिरांत पाहिली पंढरी

कोरोनामुळे प्रत्येक गावातील विठ्ठल मंदिरात आज वारकऱ्यांनी दर्शन घेतले. दरवर्षी थेट पंढरपूरला जातात. तेथे दिंडीत जाऊन विठ्ठलमंदिराच्या कळसाचे दर्शन होत असे. काही भाविकांना थेट दर्शन मिळत असे. या वर्षी कोरोनामुळे मात्र ही परंपरा खंडीत झाली. गावातीलच विठ्ठल मंदिरात दर्शन घेवून त्यांनी पंढरपुरात आल्याचा आनंद घेतला. 

आषाढी एकादशनिमित्त भजन, कीर्तन होत असत. या निमित्त महाराज मंडळींना थोडेफार मानधन मिळत असे. या वर्षी मात्र ही सर्व मंडळी अशा मानधनापासून मुकली. गेल्या तीन महिन्यांपासून कोणताही धार्मिक कार्यक्रम नसल्याने महाराजांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. त्यांना सरकारतर्फे मानधन मिळावे किंवा महाराष्ट्रातील मोठ्या देवस्थानांनी अशा महाराजांना ठराविक मानधन द्यावी, अशी मागणी यापूर्वीच शेतकरी मराठा संघाचे संभाजी दहातोंडे यांनी केली होती. त्याबाबत मात्र अद्याप कोणीही प्रतिसाद दिला नाही. आषाढी एकादशिनिमित्त या मागणीबाबत विचार व्हावा, असे मत महाराजांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात जाणेही मुश्किल होत असले, तरी ग्रामीण भागातील लहान मंदिरे मात्र खुलीच असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन काहीसे शिथिल झाले असल्याने ते शक्य आहे. तथापि, तेथे गर्दी होणार नाही, याची काळजी आता ग्रामस्थ घेताना दिसत आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात याबाबत सरपंचांकडून नियोजन होत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख