जामखेड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या स्नुषा, आमदार रोहित पवारांच्या मातुःश्री, राजेंद्र पवार यांच्या पत्नी, असे सीमित न राहता, सुनंदा पवार यांनी स्व-कर्तृत्वातून वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी पेटविलेला समाजसेवेचा नंदादीप असाच तेवत राहील. समाजातील निराधार, पीडित, दुर्लक्षित, बेरोजगारांकरिता तो प्रकाशवाट ठरेल.
सुनंदा पवार या बारामती येथील विविध संस्थांच्या विश्वस्त. मात्र, साधी राहणी. आदराने त्यांना कोणी वहिनीसाहेब म्हणते, तर कोणी आईसाहेब. कर्जत-जामखेड तालुक्यांमध्ये ग्रामसभांच्या माध्यमातून त्या थेट लोकांपर्यंत पोचतात. आपली भूमिका समजावून सांगतात. लोकांचे म्हणणे ऐकून घेतात. दोन्ही तालुक्यांतील महिलांचे आरोग्य, स्वच्छतेवरील त्यांचे काम चकित करणारे आहे.
हेही वाचा... शेळके यांच्या रुपाने पारनेच्या मुकुटात आणखी एक तुरा
महिला- विद्यार्थिनींशी संवाद साधताना, "स्वस्थ कन्या, स्वस्थ भारत' अभियान राबविले. महिला सुरक्षेविषयी प्रबोधन केले. त्यांच्या पुढाकाराने महिला बचतगटांची चळवळ उभी राहिली. "भीमथडी जत्रे'सारखे व्यासपीठ उभे केले. गावांना गावपण यावे, गावे स्वच्छ, सुंदर व्हावीत, तेथील पाणीपातळी वाढावी, यासाठी त्यांनी घेतलेला वसा बदलाच्या दिशेने नेणारा आहे. वृक्षलागवडीसाठी त्यांचा पुढाकार लक्षवेधी आहे. ओढे, पाझरतलाव, नदी खोलीकरणाची कामे दोन्ही तालुक्यांत झाली. शहराच्या वेगवेगळ्या भागांत रोज स्वच्छतेचा जागर सुरू आहे. विविध क्षेत्रांतील नागरिकांनी श्रमदानातून दिलेले योगदान त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. जामखेडला स्वच्छता स्पर्धेत अग्रस्थान मिळत नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही, ही त्यांची घोषणा जामखेडकरांना प्रेरणादायी ठरली.
हेही वाचा... राष्ट्रवादीच्या हाती कारखानदारांची दोरी
सासूच्या पावलांवर पाऊल
ज्येष्ठ नेते शरद पवार हे पहिल्यांदा आमदार झाले, त्यावेळी त्यांच्या मातुःश्री शारदाताई गोविंदराव पवार यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यांचा जनसंपर्क एवढा दांडगा होता, की संबंधित गावांतील कार्यकर्त्यांना त्या त्यांच्या नावाने ओळखत. त्यांनी जपलेला हा स्नेह पुढे शरद पवार यांना त्यांच्या राजकीय जीवनात खूप उपयोगी ठरला. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून सुनंदा पवार यांचे काम सुरू आहे.
Edited By- Murlidhar Karale

