MLA Rohit Pawar's letter to homeowners also makes them think | Sarkarnama

आमदार रोहित पवार यांचे घरमालकांना असेही पत्र, आत्मचिंतन करायला लावणारे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 जून 2020

अनेक कामगार, छोटे व्यावसायिक सिंगल किंवा डबलरुम भाड्याने घेतात. त्यांना हे भाडे देणे शक्य नाही. काही घरमालक मात्र त्यांच्याकडे तगादा लावत आहेत.

नगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरमालकांनी आपल्या भाडेकरुंचे शक्य असेल ते पूर्ण किंवा अर्धे भाडे माफ करावे, भाडेकरुही कोरोनाच्या संकटात आहेत, त्यात दिलासा द्यावा. ती मंडळी हे उपकार आयुष्यभर विसरणार नाहीत, अशी विनंतीवजा पत्र आमदार रोहित पवार यांनी समस्त घरभाडेमालकांना दिले आहे.

पवार यांनी पत्रात म्हटले आहे, की अनेकजणांचे आपल्याला फोन येत असून, भाड्याबाबत ते कळवळून बोलत आहेत. काहींना फोनवरच आपले अश्रू अनावर झाले आहेत. कोरोनाच्या संकटात रोजीरोटीचाच प्रश्न निर्माण झाल्याने व रोजगारही नसल्याने भाडे देऊ शकत नाहीत, असे अनेक फोन आले. रस्त्यावर छोटा-मोठा व्यवसाय करणारे, शेतकरी, केस कापणारे कामगार, घरकाम करणाऱ्या महिला भगिनी, वेटर, रिक्षावाले अशा आर्थिक दुर्बल वर्गाला या संकटाची मोठी झळ बसली आहे. या वर्गाकडे आर्थिक क्षमता नाही. आज काम केले नाही, तर उद्याच्या जेवणाचा प्रश्न आहे, अनेक कामगार, छोटे व्यावसायिक सिंगल किंवा डबलरुम भाड्याने घेतात. त्यांना हे भाडे देणे शक्य नाही. काही घरमालक मात्र त्यांच्याकडे तगादा लावत आहेत.  

घरमालकांनी भाडेकरुंना अशा काळात मदत करायची नाही, तर इतर कोणत्या वेळी मदत करणार आहात. हीच वेळ आहे माणुसकी दाखविण्याची. काही घरमालकांनी खरोखर अशी माणुसकी दाखविली आहे. संपूर्ण भाडे माफ केले आहे. काहींनी अर्धे भाडे माफ केेले. त्यांचे खरेतर खूप खूप अभिनंदन. राज्य व केंद्र सरकार आपापल्यापरीने लोकांच्या हिताची कामं करीत आहेच, पण जबाबदार, संवेदनशील माणूस म्हणून आपलीही जबाबदारी आहे. काही प्रश्न हे कायद्याच्या, नियमांच्या पलीकडे जावून सोडवायचे असतात. आज कोरोनाचं संकट आलं नसतं, तर घरभाडं माफ करा किंवा कमी करा, असं मी किंवा कुणीही तुम्हाला म्हटलं नसतं. अडचण आहे म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतोय. या विनंतीला मान देवून तुम्ही भाड्याबाबत योग्य निर्णय घ्याल, असा विश्वास आहे.

आमदार पवार यांनी दिलेले हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. घरमालकांनी या पत्राचा संदर्भ घेवून निर्णय घेण्याची गरज आहे. एक आमदार आपल्याला विनंती करतात, म्हटल्यावर आता भाडेकरूही त्यांना फोन करून घरमालकांबाबत माहिती देवू शकतात. त्यामुळे या पत्राचा उपयोग चांगला होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हे पत्र केवळ कोणत्या एका मतदारसंघासाठी नसून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आहे. भाडेकरी व घरमालक यांच्यातील या प्रश्नाला आमदार पवार यांनी योग्य वेळी लक्ष दिले असल्याने अनेकांचे भाडे माफ होण्यास मदतच होणार आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख