जामखेड : जामखेड येथील मोरे वस्तीवर राहणारे बोराडे व जायभाय यांच्या घरावर चोरांनी चोरी करीत घरातील व्यक्तींना मारहाण केली. बोराडे यांच्या घरी बाप-लेकीने केलेल्या प्रतिकारामुळे प्रसंगावधान राखीत चोरट्यांना पळ काढला, तर दुसरीकडे मात्र जायभाय यांच्या घरी मारहाण करुन जीवे मारण्याचा धाक दाखवून सोन्याचा ऐवज लुटला.
दिवाळी सणाच्या तोंडावर चोरांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. गुंडगिरीपासून अभय देणाऱ्या आमदार रोहित पवार यांचे जामखेड आता चोरांच्या भितीने भयभीत झाले आहे. चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी नागरिक आमदार यांना साकडे घालीत आहेत.
जामखेड येथील मोरे वस्तीत राहणारे येथील तालुका क्रषी कार्यालयात क्रषी सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या बाळासाहेब बोराडे यांच्या घरावर चोरटय़ांनी दरवाज्या तोडुन घरात प्रवेश केला. घरात बाळासाहेब आणि त्यांची मुलगी सायली दोघे स्वतंत्र खोल्यात झोपले होते. चोरट्यांनी बाळासाहेबांच्या खोलीकडे मोर्चा वळविला. चोरटे घरात घुसल्याचे बाळासाहेबांच्या लक्षात येताच ते जागे झाले. त्यांनी चोरट्यांना प्रतिकार केला, मात्र लोखंडी राँडने त्यांना जबर मारहाण केली. या वेळी झालेल्या आवाजाने शेजारच्या खोलीत झोपलेली पंधरा वर्षाची त्यांची मुलगी सायली हिच्या लक्षात आले. तिने रुम उघडली.बाहेर येताच वडीलांना चौघेजण मारहाण करीत आहेत, असे तिने पाहिले. वडील त्यांना प्रतिकार करीत आहेत. मात्र ते संख्येने अधिक आहेत, हे सायलीच्या लक्षात आले.
क्षणार्धात जीवाची पर्वा नकरता जवळ पडलेली बॅट घेऊन ती चोरट्यांच्या दिशेने धावली आणि तिनेही चोरट्यांना मारायला सुरुवात केली. दरम्यान, तिलाही चोरट्यांनी राॅडने मारहाण केली, मात्र दोघा बापलेकीने आपला प्रतिकार चालूच ठेवला. ही मारहाण आठ ते दहा मिनिटे सुरू होती. या घटनेमुळे रात्रीच्या शांत वातावरणात मोठा आवाज झाला आणि परिसरातील लोक जागेही झाले. तसेच सायलीने पहिल्या मजल्यावर राहत असलेल्या ढेरे दामपत्याला आवाज दिला. चोर आले आहेत खाली या, असा अवाज दिला. परिसरातील लोकही जागे झाले. मात्र चोरट्यांनी तेथून पळ काढण्यात धन्यता मानली. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात चार चोरट्यांविरुद्ध बाळासाहेब बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला.
दुसरीकडे मोरे वस्ती येथेच जामखेड पब्लिक स्कूलजवळ बाबासाहेब रावसाहेब जायभाय (वय ३५) यांच्या घरीही चोरट्यांनी मारहाण करून चोरी केली. घराच्या पाठीमागील बाजूस भिंतीच्या गेटचे कुलूप तोडून घराचा दरवाजा आत ढकलून घरात प्रवेश मिळविला आणि चाकूचा धाक दाखवून ४६ हजार पाचशे रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल फोन बळजबरीने काढून नेला. जायभाय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिस उपनिरीक्षकांनी दाखविली तत्परता
रात्री घडलेल्या घटनांची माहिती समजताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक निलेश कांबळे यांनी धाव घेतली. या परिसरातील रस्त्यांची नाकाबंदीही केली, मात्र पळ काढण्यात चोरटे यशस्वी झाले.
Edited By - Murlidhar Karale

