जामखेड : आमदार रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू म्हणून 'रुबाब' न करता आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी पाय जमिनीवर ठेवून विविध खात्याच्या मंत्र्यांसह अधिकाऱ्यांना सातत्याने भेटून पाठपुरावा करतात. म्हणूनच या वसाहतीच्या कामाचा प्रारंभ होऊ शकला. हे काम 18 महिन्याच्या आत पूर्ण होणार असून, पोलिस बांधवांना चांगली राहण्याची व्यवस्था होईल," असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
जामखेड येथे पोलिस कुटुंबियांसाठी निवासस्थाने उभारण्याच्या कामाचा प्रारंभ कोनशिलेचे अनावरण करून देसाई यांच्या हस्ते झाला. या वेळी आमदार रोहित पवार, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, कर्जत- जामखेडचे विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, युवा नेते सुर्यकांत मोरे, सुनील लोंढे , रमेश आजबे, लक्ष्मण ढेपे, अण्णासाहेब जाधव, संभाजी गायकवाड, विशाल नाईकवाडे उपस्थितीत होते.
देसाई म्हणाले, की राज्यातील पोलिस कुटुंबियांचा वसाहती उभारण्यासाठी राज्य शासनाने 375 कोटी रुपयांची तरतूद केली होती. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर राज्यातील चार ते पाच पोलिस वसाहती उभारण्याचा प्रस्तावाला राज्य शासनाने ' हिरवा कंदील दिला. यामध्ये आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत व जामखेड या दोन पोलीस वसाहतींचा समावेश झाला.
ते म्हणाले, "कर्जत चा कार्यक्रम आटपून जामखेड पर्यंत पोहोचत असताना प्रवासादरम्यान आमदार रोहित पवारांनी चार वर्षात मतदारसंघात करायच्या विकासकामांचा "रोड मॅप" समोर मांडला. निवडणुकीदरम्यान मतदारसंघातील बांधवांना दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी विविध खात्याच्या मंत्र्यांना अधिकाऱ्यांना आमदार रोहित पवार भेटून पाठपुरावा करतात. त्यामुळे येथील विकासाची कामे मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते केंद्र आम्ही परत आणले
आमदार रोहित पवार म्हणाले, "जामखेड तालुक्यात मंजूर असलेले रिर्जव पोलीस प्रशिक्षण केंद्र अन्यत्र गेले होते. मात्र आम्ही ते परत आणले. त्यामुळे 1000 पोलीस या पोलीस केंद्रामध्ये प्रशिक्षणासाठी राहणार आहेत. यासाठी लागणारी जमीन महसूल विभागाच्या माध्यमातून पोलीस विभागाच्या नावावर करण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण केली असून, हा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर अंतिम टप्प्यात आहे. याकरिताची तरतूद येणाऱ्या अर्थसंकल्पीय वर्षात होईल, आपणही मदत करावी म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या थाटामाटात प्रारंभाचा कार्यक्रम घेता येईल. तसेच कर्जत-जामखेड या शहरांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठीचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रस्तावित आहे. तोही आपल्या माध्यमातून पाठपुरावा व्हावा. खर्डा येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन व्हावे, यासाठीचा प्रस्तावही शासनस्तरावर अंतिम टप्यात आहे. त्यालाही " हिरवा कंदील मिळावा, याकरिता आपली मदत व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या वेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रास्ताविक केले.
दरम्यान, जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी या कार्यक्रमासाठी पोलीस कर्मचारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व इतरांचे सहकार्य घेऊन पोलीस ठाण्याचा परिसर देखणा बनविला. पोलीस ठाण्याकडे येणारे रस्ते सुसज्ज व दुर्गंधीपासून मुक्त केले. पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेली सर्व दुर्गंधी हटवली. यानिमित्ताने पोलिसांना खेळण्यासाठी मैदानीही बनवले. कार्यक्रमस्थळी मंत्री लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, तर तालुकास्तरीय कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली होती.
Edited By - Murlidhar Karale

