आमदार रोहित पवारांनी मंत्री गडकरींची भेट घेऊन आणला या कामासाठी मोठा निधी - MLA Rohit Pawar met Minister Gadkari and brought a large fund for this work | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार रोहित पवारांनी मंत्री गडकरींची भेट घेऊन आणला या कामासाठी मोठा निधी

निलेश दिवटे
मंगळवार, 6 एप्रिल 2021

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या विषयात आर्वजून लक्ष घातले होते.

कर्जत : नगर जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणारा आणि नुकताच नव्याने घोषित झालेला राष्ट्रीय महामार्ग 548 (ड) मधील आढळगाव ते जामखेड या 62.77 किलोमीटरच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी 399.33 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

पवार यांनी नुकतीच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे. न्हावरा-इनामगाव-काष्टी-श्रीगोंदा-जळगाव-जामखेड या राज्यमहामार्गाला नुकताच राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला असून, या मार्गातील आढळगाव ते जामखेड या 62.77 किलोमीटर मार्गाचे दोन लेनमध्ये चौपदरीकरण होणार आहे. या कामासाठी 399.33 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे मतदारसंघातील या रस्त्याचे भाग्य उजळले आहे.

प्रवासी वाहतुकीसह कारखानदारी वाहतुकीसाठीही हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे. केवळ इतकेच नव्हे तर नगर-सोलापूर 516 (अ) या नवीन चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात असणारे अडथळे देखील दूर होऊन या कामाची निविदा निघाली आहे.

नगर सोलापूर व आढळगाव ते जामखेड हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग तालुक्याच्या व एकंदरीतच जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरणार आहेत. तालुक्यातील या रस्त्यांच्या प्रश्नासाठी आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दोनदा भेट घेऊन निवेदन दिले होते. तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत एकदा बैठक घेऊन संबंधित कामाचा पाठपुरावा केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या विषयात आर्वजून लक्ष घातले होते.

रस्त्याच्या कामांसाठी पाठपुरावा केला

नगर- सोलापूर व आढळगाव ते जामखेड रस्त्याच्या कामांसाठी मी सातत्यानं केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत होतो. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. जनेतच्या मागणीचा मान राखत त्यांनी भरीव निधी मंजूर केला. या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होण्यास निश्चित मदत होईल, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख