MLA Rohit Pawar made this request to the politicians | Sarkarnama

आमदार रोहित पवार यांनी राजकारण्यांना केली ही कळकळीची विनंती

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 26 मे 2020

आगामी काही महिने तरी राजकारण बाजुला ठेवून आपल्या राज्याच्या उभारणीसाठी काम करावं, ही कळकळीची विनंती आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी व विरोधकांना केली आहे.

नगर ः ``राजकारणाच्या खेळात सर्वसामान्य माणूस, युवा व राज्याचं भवितव्य गाळात जाऊ शकतं. त्यामुळे राज्य व केंद्र सरकार, विधिमंडळ व राजभवन आणि सत्ताधारी,विरोधक या सर्वांनीच किमान पुढचे काही महिने तरी राजकारण बाजुला ठेवून आपल्या राज्याच्या उभारणीसाठी काम करावे, ही कळकळीची विनंती,`` असे ट्विट करून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सर्वच राजकारण्यांना विनंती केली आहे.

मागील पंधरा दिवसांपासून आमदार रोहित पवार व माजी खासदार निलेश राणे यांच्यात ट्विटर वाॅर सुरू होते. एकमेकांवर आरोप करताना राणे यांची भाषा घसरली होती, हे महाराष्ट्राने अनुभवले. दरम्यानच्या काळात या वक्तव्यांना फेसबूक, ट्विटरवर ट्रोलरने शेलक्या शब्दांत दोघांचाही समाचार घेतला. या पार्श्वभूमीवर हा वाद संपवावा, अशी अपेक्षा इतर नेत्यांनीही व्यक्त केली. कोरोनाचे भयान संकट समोर असताना असा राजकीय वाद उद्भवू नये, याबाबत आज आमदार पवार यांनी केलेले ट्विट महत्त्वाचे मानले जाते.

 

 

याबरोबरच राज्यात भारतीय जनता पक्षाचे नेते विविध कारणे काढून सरकारवर टीका करीत आहे. नुकत्याच झालेल्या आंदोलनात महाआघाडीचे सरकार तिन पायाचे असल्याची टीका करीत विरोधकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलने केले. रेल्वे गाड्यांचा प्रश्न, परप्रांतीयांचा प्रश्न याबरोबरच आरोग्याच्या प्रश्नावरून राजकारण सुरू आहे. राजकारणातील अशा प्रश्नांवरून होणारी चिखलफेक थांबविण्याची विनंती आमदार पवार करीत आहेत.

आमदार पवार यांनी ट्विट करताना राजकारणाचा खेळ या वेळी खेळू नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे युवा पिढीबरोबरच राज्याचे भवितव्य गाळात जाण्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महिने तरी कोणीही राजकारण करू नये. एकमेकांवर चिखलफेक करू नये, असे आवाहन त्यांनी राजकारण्यांना केले आहे.

सध्या समाजात युवा पिढी बेरोजगारीने ग्रासली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. लाॅकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत. मागणी नसल्याने कारखाने सुरू करता येईनात, अडकून पडलेल्या लोकांना मायभूमीत येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. असे सर्व प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी महाआघाडी सरकारची दमछाक होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकारण थांबविण्यासाठी पवार यांनी केलेल्या विनंतीला अधिक महत्त्व आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख