आमदार रोहित पवारांना वशिला किंवा मध्यस्थीची गरज नाही : शंभुराजे देसाई - MLA Rohit Pawar does not need vassals or mediators: Shambhuraje Desai | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार रोहित पवारांना वशिला किंवा मध्यस्थीची गरज नाही : शंभुराजे देसाई

नीलेश दिवटे
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

रोहित पवार हे दूरदृष्टीचे नेतृत्व आहेत. त्यांना वशिला अथवा मध्यस्थीची गरज नाही. कामे काशी करवून घ्यायची, हे त्यांच्याकडून शिकावे. तुमची निवड सार्थ असून, तुम्हाला काही कमी पडणार नाही.

कर्जत : रोहित पवार हे दूरदृष्टीचे नेतृत्व आहेत. त्यांना वशिला अथवा मध्यस्थीची गरज नाही. कामे काशी करवून घ्यायची, हे त्यांच्याकडून शिकावे. तुमची निवड सार्थ असून, तुम्हाला काही कमी पडणार नाही, अशी स्तुतीसुमने महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज कर्जत तालुक्यात उधळली.

पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार रोहित पवार, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी, उपजिल्हाध्यक्ष प्रवीण घुले, समाज कल्याण समिती सभापती उमेश परहर, सभापती अश्विनी कांनगुडे, पोलीस गृहनिर्माणच्या दीपाली भाईक, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, बळीराम यादव, दीपक शहाणे, पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, तहसीलदार नानासाहेब आगळे, बारामती ऍग्रोचे राजेंद्र पवार, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आदी उपस्थित होते.

देसाई म्हणाले, की सर्वांगीण विकासासाठी आघाडी सरकार भक्कमपणे पाठीशी उभे राहील, आमदार रोहित पवार हे दूरदृष्टीचे नेतृत्व असून, त्यांच्या पाठपुराव्यातून कर्जत- जामखेडमध्ये अद्ययावत अशी पोलीस निवासस्थाने उभारली जात आहेत. आपली निवड सार्थ असून, येथे विकासाचे पर्व सुरू झाले आहे.

ते म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वात प्रथम पोलिसांच्या घराची अवस्था सुधारली पाहिजे. यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारच्या अर्थ संकल्पात पोलीस विभागासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील सहकार्य मिळाले आहे.

पोलीस प्रशासनास चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोरोना काळात कर्तव्य करीत असताना कामाचा अतिरिक्त ताण पोलिसांवर पडत असल्याने अनेक जण शहीद झाले. पोलीस विभागांला चांगली आणि सुसज्ज वाहने उपलब्ध करण्यात आली आहे. आमदार रोहित पवार यांच्याकडे कर्जत- जामखेड मतदारससंघासाठी दूरदृष्टी आहे. मतदारसंघासाठी काम कसे करायचे, हे आमदार पवार यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.

प्रत्येक विभागासाठी वसाहत उभारण्याचा मानस

आमदार रोहित पवार म्हणाले, की तालुक्याच्या विकासकामांत अधिकाऱ्यांचे  योगदान महत्वपूर्ण असते. यामुळे प्रश्न मार्गी लागत विकासाला चालना मिळते. त्याच पार्श्वभूमीवर आज पोलीस वसाहत भूमिपूजन कार्यक्रम पार पडत आहे. प्रत्येक विभागासाठी वसाहत उभारण्याचा मानस पवार यांनी या वेळी व्यक्त केला.

तालुक्याच्या विकासासाठी लोकांनी आपल्याला निवडून देण्याचे काम केले आहे, त्याच आशीर्वादावर कर्जत- जामखेड मतदारसंघाचा विकास करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. जिल्हा पोलिस दलासाठी आगामी काळात २० वाहने महाराष्ट्र राज्य सरकारने उपलब्ध केली आहेत.

महिलांसाठी भरोसा सेल मतदारसंघात स्थापन करून भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी नागरिकांनीदेखील पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पवार यांनी केले.

कर्जत- जामखेडसाठी सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध करण्याची मागणी शंभूराज देसाई यांच्याकडे करण्यात आली.

प्रास्ताविक करताना पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, आजचा दिवस पोलीस कुटुंबियांसाठी आनंदाचा क्षण आहे. त्यांच्या घराचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. दोन पोलीस अधिकारी आणि ३६ पोलीस कर्मचाऱ्यासाठी निवासस्थाने साकार होणार आहे. आभार पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी मानले.
 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख