आमदार रोहित पवार ठरले `शेरास सव्वाशेर` ! पडळकरांना दिले हे झणझणीत उत्तर

माझे मित्र गोपीचंद पडळकरजी, माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. बरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातलात.
padalkar -rohit.png
padalkar -rohit.png

नगर : आज सकाळी भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी मिरजगाव येथील खड्ड्यांचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करीत या मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. त्याबाबत आमदार पवार मोठ्या खुबीने उत्तर देत `शेरास सव्वाशेर` ठरले.

पडळकर आज सकाळी औरंगाबादकडे जात असताना मिरजगाव येथे असलेले खड्डे पाहून थांबले. त्यांनी स्वतःचा व्हिडिओ खड्ड्यांसोबत काढून आमदार पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ट्विटरच्या माध्यमातून ही टीका राज्यभर गाजली. त्याला फेसबूकवरून आमदार पवार यांनी उत्तर दिले.

पवार यांनी सोशल मीडियाद्वारे म्हटले आहे, की माझे मित्र गोपीचंद पडळकरजी, माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. बरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातलात. यामुळं तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरं वाटेल. माझ्या मतदारसंघातील या एकाच नाही, तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था होती आणि अजूनही काही रस्त्यांची अशीच दुरवस्था आहे. कारण या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे आपल्याच पक्षाचे आमदार होते. त्यामुळं इथं पंचवीस वर्षांचा बॅकलॉग आहे. मला आमदार होऊन अजून एक वर्षही झालं नाही. तरी मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरुन काढण्यासाठी काम करतोय आणि कोरोना नसता तर मतदारसंघातील बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते, असो. 

पंचवीस वर्षांपैकी पाच वर्षे याच मतदारसंघातील आमदार हे राज्यात वजनदार खात्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते, तरीही रस्त्यांची ही दुरवस्था आहे, याचा जाब खरंतर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता. पण आपण मोठे नेते आहात, त्यामुळं त्यांना जाब विचारणार नाहीत.

आणखी एक मुद्दा म्हणजे कर्जत-जामखेड याच मतदारसंघाची निवड का केली, असा प्रश्न मला मिडियासह अनेकांनी विचारला आणि त्याचं उत्तर मी यापूर्वीही अनेक जाहीर कार्यक्रमांतही दिलंय. ते म्हणजे या मतदारसंघाची अशी दुरवस्था असल्यानं इथं काम करण्यासाठी खूप वाव आहे. हे मी आधीच सांगितलंय, त्यामुळं आपण मिरजगावमधील खराब रस्ता आज दाखवला, यात नवीन काहीच नाही आणि अशा खराब रस्त्यांना कंटाळूनच ते दुरुस्त करण्याची जबाबदारी या मतदारसंघातील लोकांनी विश्वासाने माझ्यावर टाकली आणि मी ती पूर्ण करणारच. मी हवेतून पाणी काढणारा किंवा वाघाच्या जबड्यात हात घालणारा नेता नाही, तर जमिनीवर उतरून काम करणारा, लोकांचा विकास करण्याची शपथ घेऊन ती पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं माझ्या मतदारसंघाची चिंता आपण करू नका.

राहिला प्रश्न साहेबांच्या खांद्यावर बसण्याचा, तर साहेब हे आमचे नेते, मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आहेत आणि त्याचा मला अभिमानही आहे. पण मी कुणाच्या खांद्यावर बसतो, याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात असं मी विचारणार नाही, पण आतातरी आहात त्याच ठिकाणी राहिलात, तरी आपल्यावरील लोकांचा विश्वास नक्की वाढेल. त्यासाठी आपण जरूर प्रयत्न करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com