नगर : जामखेड-कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोकांना एक खास गिफ्ट मागितले आहे. बुके, पुष्पगुच्छ, शाल या वस्तू नको, त्याऐवजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या परिसरातील लोकांना मदत करा. जवळच्या लोकांना, आप्तेष्टांना, मित्रांना, गरीबांना आपापल्या परीने साह्य करा, हेच आपले गिफ्ट असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावरून आवाहन करीत पवार यांनी भावपूर्ण पोष्ट व्हायरल केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की सध्या काही विद्यार्थ्यांना आॅनलाईन अभ्यास करण्यासाठी मोबाईल नाहीत. शक्य असल्यास छोटासा हॅंडसेट देण्याचा प्रयत्न करा. एकट्याला शक्य नसेल, तर मित्रांनी एकत्र येऊन मदत करा. काही विद्यार्थी दहावी, बारावीला आहेत. शाळेची फी भरण्यासाठी काहींना शक्य होत नाही. त्यांना साह्य करा.
कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांना मदत करा. स्वतः चालू केलेल्या व्यवसायात आपल्या जवळच्या व्यक्तींना काही काम देता येईल का ते पहा. आपल्या मित्रांना मदत करा. कोरोनाच्या काळात मदतीची खूप गरज आहे. एका व्यक्तीलाही मदत करू शकलो, त्यांचे आयुष्य बदलू शकलो, तर त्याचे मोठे समाधान होईल.
कोरोनामुळे अनेकजण घाबरलेले असतात. अशा कुटुंबापासून नातेवाईकही दुरावतात. अशा वेळी त्यांना आवर्जुन मदत करा. त्यांना धीर द्या. कोरोनाग्रस्त आहे, म्हणून त्याची हेटाळणी होत असेल, तर तेथे प्रबोधन करा, असे आवाहन पवार यांनी केले आहे.
शंभर मुलींचे शिक्षण करणार
मी केवळ तुम्हालाच सांगतो, असे नाही. तर ती गोष्टी मी स्वतःही करीत आहे. कोरोनाच्या काळात अडचणीच्या असलेल्या कुटुंबातील शंभर मुलींचे शिक्षण मी बारामतीला करीत आहे. असे उपक्रम करण्याचा प्रयत्न करा. हेच विद्यार्थी तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाहीत.

