"वृद्धेश्‍वर' बिनविरोध करण्यासाठी आमदार मोनिका राजळे प्रयत्नशील - MLA Rajale's attempt to make Vriddheshwar unopposed | Politics Marathi News - Sarkarnama

"वृद्धेश्‍वर' बिनविरोध करण्यासाठी आमदार मोनिका राजळे प्रयत्नशील

राजेंद्र सावंत
बुधवार, 13 जानेवारी 2021

कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी किचकट अटी असल्याने, उमेदवारांची संख्या कमी राहण्याची शक्‍यता आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून देवदत्त केकाण काम पाहत आहेत. तहसीलदार श्‍याम वाडकर त्यांना सहकार्य करीत आहेत.

पाथर्डी : वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. कारखान्याच्या 19 संचालकांसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांचा गट आग्रही आहे, तर निवडणूक होणारच, असा चंग शिवशंकर राजळे यांच्या गटाने बांधला आहे.

शिवशंकर राजळे पॅनल उभे करण्यासाठी उमेदवारांची जुळवाजुळव करीत आहेत. सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयात सहा उमेदवारांनी सात अर्ज दाखल केले आहेत. 
कासार पिंपळगाव गटातून आप्पासाहेब दादाबा राजळे, उद्धव रघुनाथ वाघ, टाकळीमानूर गटातून गोरक्ष कारभारी फुंदे, बाबासाहेब आश्रूबा गर्जे, सहकारी संस्था व बिगरउत्पादक संस्था मतदारसंघातून आप्पासाहेब राजळे, नागरिकांचा मागास प्रवर्गातून ऍड. विष्णुदास कस्तुरबा भोरडे, भटक्‍या-विमुक्त जाती मतदारसंघातून भाऊसाहेब मळू उघडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 

कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी किचकट अटी असल्याने, उमेदवारांची संख्या कमी राहण्याची शक्‍यता आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून देवदत्त केकाण काम पाहत आहेत. तहसीलदार श्‍याम वाडकर त्यांना सहकार्य करीत आहेत. 

 

हेही वाचा...

आमदार मोनिका राजळे यांच्या गावात चुलत सासू-सुनांत लढत

पाथर्डी : तालुक्‍यातील 75 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रचार शिगेला पोचला आहे. अटीतटीच्या लढतींपैकी अकोला, मिरी, माणिकदौंडी, कासार पिंपळगाव, चितळी येथील दुरंगी लढती लक्षवेधी ठरत आहेत. कासार पिंपळगाव येथे आमदार मोनिका राजळे यांच्या जाऊबाई सरपंच मोनाली राजळे यांची लढत प्रतिष्ठेची आहे. या गावात मोनाली राजळे व त्यांच्या चुलत सासू मंगल राजळे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. 

अकोला येथे अनिल ढाकणे व संभाजी गर्जे यांच्यातील लढत काट्याची होईल. माणिकदौंडी ग्रामपंचायतीमध्ये समीर पठाण व आलमगीर पठाण यांच्यातील लढत अटीतटीची आहे. 219 प्रभागांतील 575 सदस्यांसाठी एक हजार 321 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक गट, व्यक्ती, भावकी, जात व धर्म, असे अनेक पदर ग्रामपंचायत निवडणुकीला असतात. आर्थिक प्रबळ उमेदवारांबाबत जनतेमध्ये चीड निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

चितळी येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे व भाजपचे सुभाष ताठे या पारंपरिक विरोधकांमध्ये या वेळी दिलजमाई झाली आहे. दोघांनी मिळून केलेल्या पॅनलला अशोक ताठे यांनी कडवे आव्हान दिले आहे. सुसरे गावात दादा पाटील कंठाळी व सहकाऱ्यांच्या पॅनलने पाच जागा बिनविरोध मिळविल्या आहेत. निपाणी जळगावमध्ये बंडू पठाडे, नितीन गर्जे, वसंत बोर्डे यांच्या पॅनलसमोर अजय रक्ताटे, बाबासाहेब चौधर यांच्या पॅनलने चांगलाच संघर्ष उभा केला आहे. खरवंडीत जुने-नवे वाद असून, कोण बाजी मारतो, याकडे लक्ष लागले आहे. फुंदे टाकळी गावात भीमराव फुंदे, कुमार फुंदे, संजय फुंदे यांचे पॅनल आणि वासुदेव फुंदे व निवृत्ती फुंदे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख