आमदार राजळे यांची चिंता वाढली ! कोरोनाच्या हिटलिस्टवर आता शेवगाव-पाथर्डी - MLA Rajale's anxiety increased! Shevgaon-Pathardi is now on the hit list of Corona | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार राजळे यांची चिंता वाढली ! कोरोनाच्या हिटलिस्टवर आता शेवगाव-पाथर्डी

मुरलीधर कराळे
शनिवार, 18 जुलै 2020

शेवगाव व पाथर्डी हे दोन्ही तालुक्यांत यापूर्वी जास्त रुग्ण नव्हते. संगमनेर, जामखेड हे तालुके कोरोनाने होरपळत असताना शेवगाव-पाथर्डी शांत होते. नगर शहरात रुग्ण वाढू लागल्याने नगरहून येणाऱ्या नागरिकांकडून तालुक्यातील जनतेला धोका निर्माण झाला.

नगर : जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी या दोन तालुक्यात गेल्या दोन-चार दिवसांपासून कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. गेले अनेक दिवस हे तालुके शांत होते. रुग्णसंख्या अत्यंत कमी होती. आता मात्र रुग्ण सापडू लागल्याने शेवगाव 10 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. पाथर्डी शहरही बंद ठेवण्यात आले आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आमदार मोनिका राजळे यांची चिंता वाढली आहे.

शेवगाव व पाथर्डी हे दोन्ही तालुक्यांत यापूर्वी जास्त रुग्ण नव्हते. संगमनेर, जामखेड हे तालुके कोरोनाने होरपळत असताना शेवगाव-पाथर्डी शांत होते. नगर शहरात रुग्ण वाढू लागल्याने नगरहून येणाऱ्या नागरिकांकडून तालुक्यातील जनतेला धोका निर्माण झाला. गेल्या तीन-चार दिवसांपासून दोन्ही तालुक्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. 

शेवगाव दहा दिवसांसाठी बंद

शेवगाव तालुक्यात आज कोरोनाचे बारा रुग्ण आढळले. त्यामुळे शेवगाव शहर 10 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय तहसीलदार अर्चना भाकड यांनी जाहीर केला आहे. शेवगाव तालुक्यात दोन दिवसांपूर्वी 5 रुग्ण सापडले होते. आज शहरात 7, तर मुंगी येथे 5 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. यापूर्वी निंबे नांदूर येथील 2 रुग्णांवर उपचार सुरू आहे. सध्या तालुक्यात 19 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 40 जण बाधित आढळून आले होते. शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, आजपासून 28 जुलैपर्यंत अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना बंद राहणार आहेत. नागरिकांनी योग्य खबरदारी घेतल्यास शहरातील व तालुक्‍यातील संसर्ग थांबवता येईल.

पाथर्डीत एकाच दिवशी आढळले 22 रुग्ण

पाथर्डी तालुक्यातील आज 22 रुग्ण आढळून आले. शहरातील 20 व तिनखडी व वाळुंज येथील प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले. गुरुवारी 42, शुक्रवारी 20 तर आज 22 रुग्ण आढळल्याने तालुक्याची वाटचाल शंबरीकडे होऊ लागली आहे. प्रशासनाच्या वतीने शहर 23 तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी : आमदार राजळे

शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी अनावश्यक कामांसाठी घराबाहेर पडू नका. घरातील वृद्ध, बालकांची विशेष काळजी घ्या. डाॅक्टरांच्या सल्ल्याने काढा घेवून आपल्या कुटुंबाचे संरक्षण करा. शासकीय यंत्रणा त्यांचे काम करीत आहे. सर्वांनी त्यांना सहकार्य करा, असे आवाहन राजळे यांनी केले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख