विखे-पवार वाद मिटविण्याची आमदार पवार यांची भूमिका, पण... ! - MLA Pawar's role in settling Vikhe-Pawar dispute, but ...! | Politics Marathi News - Sarkarnama

विखे-पवार वाद मिटविण्याची आमदार पवार यांची भूमिका, पण... !

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

राजकीय स्वार्थासाठी आमच्या कुटुंबातील ज्येष्ठांविरोधात वक्तव्य केले, तर सहन करणार नाही.

नगर : "पवार व विखे घराण्यांत पूर्वी काय वाद होता, याचे सखोल ज्ञान मला नाही. सामाजिक हित डोळ्यांसमोर ठेवून या दोन कुटुंबांतील वाद संपुष्टात येत असेल, तर चांगलेच आहे. त्याचे आपण स्वागतच करू; परंतु राजकीय स्वार्थासाठी आमच्या कुटुंबातील ज्येष्ठांविरोधात वक्तव्य केले, तर सहन करणार नाही,'' असा इशारा आमदार रोहित पवार यांनी विखे कुटुंबाला दिला आहे.

आमदार पवार यांनी "कॉफी विथ सकाळ' उपक्रमात सकाळ कार्यालयास भेट दिली. "सकाळ'चे कार्यकारी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांनी "कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे' हे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. आमदार पवार यांनी राजकारणासह विविध विषयांवर संपादकीय टीमशी मनमोकळी चर्चा केली.

पवार व विखे घराण्यांतील वाद तेवत ठेवत त्यावर अनेकांच्या चुली चालल्या. आता हा वाद संपुष्टात आणून संबंधितांच्या चुली बंद कराव्या लागतील, असे वक्तव्य खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले होते. त्यास आमदार पवार यांनीही सहमती दर्शविली होती. त्यासंदर्भात आज छेडले असता पवार यांनी, पवार-विखे घराण्यांतील वाद संपुष्टात यायला हरकत नसल्याचे सांगितले. तथापि, केवळ राजकीय स्वार्थासाठी आमच्या कुटुंबातील ज्येष्ठांविरोधात वक्तव्य केल्यास खपवून घेणार नाही, असेही सुनावले. 

ज्येष्ठ नेते शरद पवार हे ठाकरे सरकारचे रिमोट कंट्रोल आहेत, अशी टीका विरोधक करीत असल्याबाबत आमदार पवार म्हणाले, ""पवार साहेब स्वतःच्या दीर्घकालीन अनुभवातून सरकारला काही मार्गदर्शन करीत असतील व सरकार ते स्वीकारत असेल, तर त्यात काहीच वावगे नाही. त्यामध्ये पवार साहेब सरकारचा रिमोट कंट्रोल आहेत, असे म्हणणे हास्यास्पद आहे. या उलट, गेली पाच वर्षे ज्यांच्यावर विश्‍वास ठेवला, त्या महाराष्ट्र पोलिसांबाबत आता अविश्‍वास दाखवून अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास केंद्र सरकारच्या अखत्यारीतील "सीबीआय'कडे देण्याचा आग्रह धरणे, तसेच कोरोनाविरोधी लढ्यासाठीचा निधी मुख्यमंत्री निधीऐवजी पंतप्रधान निधीला देणे, या बाबी कोणाच्या नियंत्रणावरून चालतात, हे जनतेला कळत नाही, अशा भ्रमात कोणी राहू नये. रिमोट कंट्रोल पवार साहेब आहेत की भाजपवाले, हे जनतेला चांगलेच उमगले आहे.'' 

राज्य सरकारचे नियोजन उत्तम

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या उपाययोजना जोमाने चालू आहेत. कोरोनाविरोधी लढ्याचे राज्य सरकारचे नियोजन "उत्तम' या सदरात मोडणारे आहे, असे आमदार पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की मोठ्या प्रमाणात तपासण्या सुरू असल्याने रुग्ण निष्पन्न होत आहेत. केंद्रानेही महाराष्ट्रासह इतर राज्यांना कोरोनाविरोधी लढ्यासाठी निधी द्यायला हवा. कोरोनाचा बागुलबुवा करून चालणार नाही. असंघटित वर्गाचे कंबरडे मोडले असून, मध्यमवर्गीय, व्यापारी, उद्योजकही अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता कोरोनासंदर्भातील नियम पाळून आर्थिक चक्र फिरविणे गरजेचे आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी व शिक्षणात दुरावा आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पालक व शिक्षकांच्या सूचनांचे पालन करण्याची बौद्धिक व मानसिक क्षमता असलेल्या वर्गांपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यात काहीच अडचण नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. आमदार असूनही राज्यातील विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी आपण पुढाकार घेत असल्याचे समाधान असल्याचे त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. 

जिल्हाधिकाऱ्यांचे काम चांगले ! 

नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आपल्या सूचनांची नोंद घेत नाहीत, आपण विरोधी पक्षातील असल्याने आपले कोणीच ऐकत नाही, अशी जाहीर कैफियत खासदार डॉ. सुजय विखे यांनी मांडली आहे. त्यासंदर्भात आमदार पवार म्हणाले, ""एखादा अधिकारी आपले व्यक्तिगत किती ऐकतो, यावरून त्याच्या कामाचे मूल्यमापन करणे योग्य नाही. कोणताही अधिकारी सरकारी नियम व धोरणे योग्य पद्धतीने राबवितो की नाही, हे पाहणे गरजेचे आहे. काही अधिकारी कडक असतात. काही बाबींमध्ये त्यांनी कडक राहिलेही पाहिजे. नगरचे जिल्हाधिकारी कडक असून, त्यांचे काम सरकारी धोरणांप्रमाणे आहे.'' 

रयतवर एन्ट्री

आमदार रोहित पवार यांचे आजोबा अध्यक्ष असलेल्या रयत शिक्षण संस्थेत आमदार रोहित यांची नुकतीच जनरल बॉडी सदस्यपदाच्या माध्यमातून "एन्ट्री' झाली. याबाबत आमदार रोहित म्हणाले, की "रयत'चे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचार जोपासत पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली संस्थेची घोडदौड सुरू आहे. महाराष्ट्रातील पंधरा जिल्हे, व कर्नाटकातील बेळगाव, असे मोठे कार्यक्षेत्र या संस्थेचे आहे. "रयत'मधील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी संस्थेतील धुरीण मंडळी सतत प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कामात आपण भरीव योगदान देणार आहोत.'' 
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख