MLA Pawar misled about the rotation of 'Kukadi': Ram Shinde | Sarkarnama

`कुकडी`च्या आवर्तनाबाबत आमदारांनी दिशाभूल केली : राम शिंदे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 जून 2020

आमदारांनी अनेकवेळ फेसबूकवर, व्हाॅटसअॅपवर जनतेशी संवाद साधला. आवर्तनाबाबतही त्यांनी शेतकऱ्यांशी जनतेशी संवाद साधला, तर बरे होईल.

कर्जत : कर्जत-जामखेडला कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडविण्याचे आश्वासन विद्यमान आमदारांनी पाळले नाही. खोटे आश्वासन देऊन त्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. फेसबुकवरून जनतेशी संवाद साधणाऱ्या आमदारांनी आवर्तनाबाबतही संवाद साधावा, अशी टीका भाजपचे माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केली.

येथील तहसील कार्यालयासमोर आज प्रा. शिंदे यांनी आवर्तनाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले. या वेळी ते बोलत होते. तहसीलदार नानासाहेब आगळे, कुकडीचे कार्यकारी अभियंता रामदास जगताप यांच्याशी त्यांनी चर्चा करून निवेदन दिले आहे. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, तालुकाध्यक्ष डाॅ. सुनील गावडे, उपनगराध्य नामदेव राऊत, अशोक खेडकर उपस्थित होते.

प्रा. राम शिंदे म्हणाले, ``नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड तसेच शेजारील करमाळा या तालुक्यांना पाणी मिळावे, असे जानेवारीमध्ये नियोजन केल्याचे सांगण्यात आले होते. विद्यमान आमदारांनी तसे जाहीर केले होते. परंतु उन्हाळ्यातील आवर्तनच गायब झाले. कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले, की 15 जूनला आवर्तन देऊ शकतो. आम्ही उपोषणाची नोटीस दिल्यानंतर घाईघाईने बैठक झाली. त्यात निर्णय घेतला की 6 तारखेला पाणी देऊ. नंतर मात्र येडगावला पाणीसाठा शिल्लक नसल्याने 6 तारखेला पाणी सोडू शकत नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे.``

त्यांनी फेसबुकद्वारे समन्वय साधावा

ते म्हणाले,``कोणताही समन्वय नाही, निर्णय नाही. त्यामुळे आम्हाला उपोषणासारखे पर्याय कोरोना महामारीच्या दरम्यान अवलंबवावे लागतात. आता अधिकारी लेखी देतो म्हणत आहेत, परंतु प्रत्यक्षात हे आवर्तन 15 तारखेच्या दरम्यान सुटेल, अशी अवस्था आहे. उन्हाळ्यात आवर्तन मिळाले नाही. प्रत्यक्षात आमदारांनी आश्वासन दिले होते. सध्या जनावरांना पाणी नाही, पिके जळाली आहेत. आमदारांकडून अशी दिशाभूल करणे ठिक नाही. आमदारांनी अनेकवेळ फेसबूकवर, व्हाॅटसअॅपवर जनतेशी संवाद साधला. आवर्तनाबाबतही त्यांनी शेतकऱ्यांशी जनतेशी संवाद साधला, तर बरे होईल,`` अशी अपेक्षा प्रा. शिंदे यांनी व्यक्त केली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख