आमदार पवार की प्रा. शिंदे यांचे पारडे जड, मंगळवारी होणार सभापतीचा फैसला - MLA Pawar Ki Shinde, Speaker's decision will be taken on Tuesday | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार पवार की प्रा. शिंदे यांचे पारडे जड, मंगळवारी होणार सभापतीचा फैसला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 जुलै 2020

जामखेड पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने आजी-माजी उपसभापतीमध्ये सरळ लढत झाली. माजीमंत्री राम शिंदे समर्थक मनिषा सुरवसे व आमदार रोहित पवार समर्थक राजश्री मोरे या दोघींच्यात ही लढत रंगली.

जामखेड : जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र सभापतीपद जाहीर झाले नाही. सभापतीपदासाठी माजीमंत्री राम शिंदे व आमदार रोहित समर्थकांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली, मात्र औरंगाबाद खंडपीठाच्या मंगळवारी (ता. 7)च्या निकाला नंतरच पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या नावाची घोषणा निश्चित होणार असल्याचे
निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी आर्चना नष्टे यांनी केले.

जामखेड पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने आजी-माजी उपसभापतीमध्ये सरळ लढत झाली. माजीमंत्री राम शिंदे समर्थक मनिषा सुरवसे व आमदार रोहित पवार समर्थक राजश्री मोरे या दोघींच्यात ही लढत रंगली.  निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र सभापती पदाच्या नावाची घोषणा झाली नाही.

औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत यासंदर्भात निर्णय जाहीर करु नये, असे निर्देश निवडणूक विभागाला देण्यात आले होते. त्यामुळे ही प्रक्रिया या स्टेजवरच थांबली.

यासंदर्भात अधिक माहिती अशी, शुक्रवारी ( ता.3) रोजी पंचायत समितीच्या सभापती पंदाच्या निवडीचा कार्यक्रम पंचायत समितीच्या सभागृहात पूर्ण झाला. सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने पंचायत समितीच्या विद्यमान उपसभापती मनिषा सुरवसे यांनी भाजपकडून, तर माजी उपसभापती राजश्री मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सभापती पदासाठी अर्ज दाखल केला.

दरम्यान, आरक्षणाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात धाव घेतलेले सदस्य डाॅ. भगवान मुरुमकर यांनी पूर्वीच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणानुसार अर्ज दाखल केला, मात्र त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 'अपात्र' ठरविला. त्यामुळे सुरवसे व मोरे या दोघींमध्ये सरळ लढत झाली. न्यायालयाच्या आदेशामुळे सभापतीपदाची घोषणा पुढील आदेशापर्य़ंत स्थगित ठेवण्यात आली आहे.

यासंदर्भात मंगळवार ( ता.7) न्यायालय कोणत्या आदेशावर शिक्कामोर्तब करते, यावरच जामखेड पंचायत समितीच्या सभापती पदाची भिस्त अवलंबून आहे.

जामखेड पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदा सभापती पदाच्या निवडीचा गुंता वाढला असून, यामागे राजकीय वर्चस्व मिळविण्यासाठी सुरु असलेल्या महत्वकांक्षेतून ही चुरस वाढली आहे. आमदार रोहित पवार यांनी ऐका माघून एक सत्तास्थाने माजी मंत्री राम शिंदे यांच्या हातून काढून घेतले आहेत. पंचायत समितीत नेमके काय घडते? न्यायालयाचा आदेश नेमका कोणाच्या पथ्यावर पडतो, हे चार दिवसानंतर स्पष्ट होईल.

दरम्यान, ही निवडणूक राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असल्याने कोणाचे पारडे जड होणार, हे मंगळवारी ठरणार आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख