आमदार नीलेश लंके यांची कोरोना रुग्णासोबत सेल्फी हीट - MLA Nilesh Lanka's selfie heat with corona patient | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार नीलेश लंके यांची कोरोना रुग्णासोबत सेल्फी हीट

मार्तंड बुचुडे
शनिवार, 27 मार्च 2021

सुपे येथील रुग्णालयात एका कोरोना रूग्णासोबत सेल्फी काढत आमदार नीलेश लंके यांनी आपण आता कोरोना महामारी सोबतच्या दुसऱ्या लढाईस सुरूवात करत आहोत, असा संदेश जनतेला दिला.

पारनेर : सुपे येथील रुग्णालयात एका कोरोना रूग्णासोबत सेल्फी काढत आमदार नीलेश लंके यांनी आपण आता कोरोना महामारी सोबतच्या दुसऱ्या लढाईस सुरूवात करत आहोत, असा संदेश जनतेला दिला. 

मी असुरक्षित असलो, तरी चालेल मात्र माझी जनता सुरक्षित असावी, असे सांगत आमदार लंके यांनी कोरोना रुग्णासोबत सेल्फी काढली. मागील वर्षी मार्च महिन्यापासूनच कोरोना रुग्ण व जनता यांच्या सोबतच लॉकडाऊनमुळे मायभूमिकडे निघालेल्या मजूर कामगारांसाठी त्यांनी मदत केली. 

रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने सध्या सरकारी तसेच खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित उपचार घेऊ लागले आहेत. खासगी रुग्णालयात कसे उपचार केले जातात, याची माहिती जाणून घेण्यासाठी लंके यांनी सुपे येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची शुक्रवारी (ता. 26) रात्री उशीरा भेट घेत त्यांनी स्वतः रुग्णासोबत सेल्फी सुद्धा काढला. या वेळी डॉ. बाळासाहेब पठारे हे देखील त्यांच्या समवेत होते. 
कोरोनाबाधित रुग्णांच्याजवळ त्यांच्या घरातील सदस्यही जात नाहीत, मात्र आमदार लंके हे उपचार घेत असलेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन थेट भेट घेत दिलासा देत आहेत. या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

हेही वाचा...

जिल्ह्यात आढळले नवे 654 बाधित 

नगर : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दिवसभरात 765 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजअखेर बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 504 एवढी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 93.23 आहे. जिल्ह्यात नव्याने 654 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आजअखेरपर्यंत आढळलेल्या बाधितांची संख्या 89 हजार 567 झाली आहे. सध्या चार हजार 871 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजअखेरपर्यंत एक हजार 192 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयातील तपासणी अहवालात 94, खासगी प्रयोगशाळेतील तपासणी 380 व अँटिजेन चाचणीत 180 बाधित आढळून आले. 

त्यांत शहरातील 256, संगमनेर 59, श्रीरामपूर 55, कोपरगाव 53, राहाता 50, पारनेर 38, नगर तालुका 33, शेवगाव 21, जामखेड 18, अकोले 18, पाथर्डी 17, कर्जत 17, राहुरी 15, नेवासे 14, तसेच अन्य जिल्ह्यांतील 13, भिंगारमधील सहा, श्रीगोंद्यातील दोघांचा समावेश आहे. दरम्यान, वाढत्या रुग्णांमुळे शहरात लवकरच लाॅकडाऊन होईल की काय, अशी भिती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख