आमदार निलेश लंके यांचा निर्णय ! यापुढे सत्कार बंद, स्विकारणार शालेय साहित्य - MLA Nilesh Lanka's decision! No more receptions, accept school materials | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

आमदार निलेश लंके यांचा निर्णय ! यापुढे सत्कार बंद, स्विकारणार शालेय साहित्य

मार्तंड बुचुडे
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

मतदारसंघातील अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा आहे. मात्र, पैशांअभावी ही मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून सत्कार स्वीकारण्यास माझे मन तयार नाही.

पारनेर : माझ्या मतदारसंघातील अनेकांचे शिक्षण केवळ शालेय साहित्य व पैसे नसल्याने थांबले. अनेकांना अत्यावश्‍यक वस्तूही मिळत नाहीत. अशा वेळी मी जनतेचे सत्कार स्वीकारणे योग्य नाही. त्यामुळे यापुढील काळात मी कुणाचाही सत्कार स्वीकारणार नाही. ज्यांना माझा सत्कार करावा वाटतो, त्यांनी त्याऐवजी शालेय मुलांना उपयोगी पडतील, असे शैक्षणिक साहित्य, तसेच गोरगरीबांना उपयोग पडतील, अशा वस्तू भेट म्हणून द्याव्यात. आपण ते साहित्य गरजू लाभार्थींना देऊ, अशी माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. 

लंके म्हणाले, ""मतदारसंघातील अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा आहे. मात्र, पैशांअभावी ही मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून सत्कार स्वीकारण्यास माझे मन तयार नाही. त्यामुळे यापुढे कोणीही माझा सत्कार करू नये. तशी कोणाची इच्छा असल्यास गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत करावी. माझ्या सत्कारावरील शाल, हार किंवा पुष्पगुच्छ, यांवर कोणीही खर्च करू नये. यापुढे मीही असे सत्कार स्वीकारणार नाही, असा निश्‍चय केला आहे. त्याऐवजी होतकरू विद्यार्थ्यांना लागणारे साहित्य देऊन त्यांना शिक्षणासाठी मदत करावी.'' 

ज्येष्ठांसाठी, समाजातील निराधार, गरजू लोकांसाठी जीवनावश्‍यक वस्तू द्याव्यात. मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलो, तरी तुम्ही व मी समाजाचे काही तरी देणे लागतो, हा विचार मनात असला पाहिजे. त्यामुळे माझा सत्कार करण्याऐवजी गरजूंना मदत करा. माझ्यासाठी हार-तुरे, भेटवस्तू आणू नका. गरजूंची मदत, हाच माझा सत्कार समजावा, असे आवाहन लंके यांनी केले आहे. 

दरम्यान, लंके यांनी यापूर्वीही अनेकदा कार्यकर्त्यांना सांगून सत्कारावर जास्त खर्च करू नका, असे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे मतदारसंघातील गरीब विद्यार्थ्यांना यापूर्वी त्यांनी अनेकदा मदत केली. एका कार्यक्रमात एका व्यक्तीला चप्पल नव्हती, तेव्हा त्यांनी स्वतःची चप्पल त्यांना दिली होती. त्यानंतर अनेक गरजुंना चप्पल वाटून त्यांनी वेगळा उपक्रम केला होता. याचबरोबर विधानसभा निवडणुकीपूर्वीही त्यांनी मतदारसंघातील महिलांना देवदर्शन घडविण्यासाठी विविध सहली काढल्या. कोरोनाच्या काळातही अनेकांना मदत दिली. कोविड सेंटर चालवून रुग्णांना मदत केली. या सर्व उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सत्कारावर खर्च टाळावा व गरीब विद्यार्थ्यांना त्या खर्चाचा फायदा व्हावा, त्यांची गरज भागावी, यासाठी हा निर्णय घेतला.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख