पारनेर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 61 व्या वाढदवसानिमित्त आमदार निलेश लंके यांच्या हस्ते गरजुंना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये 61 सायकली, 3 संगणक, 3 शिलाई मशीन, 3 झेरॉक्स मशीन व 2 इलेक्ट्रॉनिक रिक्षाचे वाटप करण्यात आले. या वेळी लंके यांनी स्वतः ही रिक्षा चालवून पाहिली आणि या उपक्रमाचे उद्घाटन केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला 61 वा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा, असे आवाहन केले होते. त्या निमित्ताने पारनेर - नगर मतदार संघातील गरजुंना आज जिल्हा परिषदेच्या सदस्या राणी लंके यांच्या प्रयत्नातून टाकळी ढोकेश्वर, ढवळपूरी, सुपा, पारनेर व वाडेगव्हाण या परिसरातील आदिवासी लोकांना मोफत साहित्याचे वाटप लंके यांच्या हस्ते करण्यात आले. पारनेर येथील लंके यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर या साहित्यांचे वाटप केले.
पवार यांच्या विचारांचा वारसा
या वेळी लंके म्हणाले, की राजकारणाला समाजकारणाची जोड द्यावी व समाजातील वंचित घटकाला न्याय व मदत द्यावी, अशी शिकवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यांनी या माध्यमातून देशात व राज्यातही आदर्श काम उभे केले आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा घेवुन या पुढील काळात काम करणार आहोत. शासनाच्या सर्व छोट्या मोठ्या योजना समाजातील शेवटच्या वंचित व गोरगरीब घटकांपर्यत पोहचविण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. या वंचित घटकाला न्याय व मदत देण्यासाठी मी कायम कटिबद्ध असून, त्यांना मदत करणे, हे मी माझे कर्तव्य समजतो. शालेय मुलांना शाळा कॉलेजमध्ये पायी यावे लागते, त्यांची सोय व्हावी, यासाठी सायकलींचे वाटप केले. आता मुलांनी त्याचा फायदा घेत अभ्यासात प्रगती करावी, अशी अपेक्षा लंके यांनी व्यक्त केली.
Edited By - Murlidhar Karale

