आमदार मोनिका राजळेंची कमाल, `वृद्धेश्‍वर` बिनविरोधसाठी यशस्वी मनधरणी  - MLA Monica Rajale's maximum, 'Vriddheshwar' unopposed successful mindset | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार मोनिका राजळेंची कमाल, `वृद्धेश्‍वर` बिनविरोधसाठी यशस्वी मनधरणी 

राजेंद्र सावंत
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांनी विरोधी गटाचे अर्जुन राजळे यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी केली.

पाथर्डी : वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांनी विरोधी गटाचे अर्जुन राजळे यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी केली.

काशिनाथ लवांडे, सुभाष ताठे, शेषराव कचरे, उद्धव वाघ यांनी केलेल्या मध्यस्थीला उशिरा का होईना, पण यश आले. अर्जुन राजळे यांनी शेजारील कारखाने देतील, तेवढा उसाला भाव द्या, सभासदांना कमी दराने साखर व उसतोडणीत भेदभाव नको, अशा मागण्या करीत अर्ज मागे घेतला. आमदार राजळे यांचे नेतृत्वकौशल्य कामी आले. 

वृद्धेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार राजळे यांनी ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे यांच्या नेतृत्वाखाली सुरवातीपासून जोमाने काम केले. पाथर्डी गटातील दोन संचालकांच्या जागा अर्ज दाखल करतानाच बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर विरोधकांना पूर्ण पॅनल तयार करण्यात अपयश आले.

कासार पिंपळगाव ग्रामपंचायत निवडणुकीमुळे कारखाना निवडणुकीत लक्ष देताना मर्यादा आल्या. इतर ठिकाणच्या उमेदवारांनी माघार घेतली; मात्र कासार पिंपळगाव गटातील दोन जागांसाठी तीन अर्ज शिल्लक राहिले. तेथे आप्पासाहेब राजळे, उद्धव वाघ व अर्जुन राजळे यांचे अर्ज होते. काशिनाथ लवांडे, सुभाष ताठे, शेषराव कचरे, उद्धव वाघ यांनी मध्यस्थी करीत अर्जुन राजळे यांच्याशी चर्चा केली.

कारखाना आर्थिक संकटात असल्याने निवडणूक नको, अशी भूमिका मांडली. अर्जुन राजळे यांनीही आम्हाला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, असे सांगितले. आमदार राजळे यांनी अर्जुन राजळे यांच्या घरी जाऊन चर्चा केली. "तुमचा सन्मान करू. मागण्यांचा सकारात्मक विचार होईल' अशी ग्वाही दिली. अखेर अर्जुन राजळे यांनी अर्ज मागे घेतला. आमदार राजळे यांनी 9 नवीन चेहऱ्यांना संधी दिली. 
उद्धव वाघ हे सर्वाधिक ज्येष्ठ संचालक म्हणुन गेल्या 40 वर्षांपासून काम करीत आहेत. कारखाना निवडणूक बिनविरोध झाल्याने आता जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी रणनीती आखण्यासाठी राजळे यांना वेळ मिळणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात याची चर्चा सुरू आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख