आमदार मोनिका राजळेंना मिळाले माहेर नि सासरीही राजकारणाचे धडे - MLA Monica Rajale got both Maher and Sasari lessons in politics | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार मोनिका राजळेंना मिळाले माहेर नि सासरीही राजकारणाचे धडे

राजेंद्र सावंत
रविवार, 7 मार्च 2021

जनतेने दोन वेळा शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. चांगल्या मनाने केलेले कोणतेही कर्म मानवाला अंतिम कल्याणाकडे नेते.

पाथर्डी : माहेर नि सासर, अशा दोन्हीकडे समाजसेवेचे धडे मिळाले. त्यातून महिलांसाठी काम करण्याची संधी मिळाली. क्रिकेटमध्ये महिला संघातून चांगली कामगिरी केली. (स्व.) गोपीनाथ मुंडे व राजीव राजळे यांनी राजकीय संधी दिली. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आधार दिला. त्यातून महिलांच्या प्रश्नांवर काम करता आले. 

हेही वाचा... राष्ट्रवादीच्या हाती कारखानदारांची दोरी

जनतेने दोन वेळा शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. चांगल्या मनाने केलेले कोणतेही कर्म मानवाला अंतिम कल्याणाकडे नेते. पाथर्डी हा दुष्काळी तालुका. पाणी ही इथली प्रमुख समस्या. आप्पासाहेब राजळे, राजीव राजळे यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात जलसंधारणाची कामे केली. मला संधी मिळाली, त्यावेळी जलसंधारण खाते सुरवातीला पंकजा मुंडे व नंतर राम शिंदे यांच्याकडे आले. त्यावेळी पाथर्डी तालुक्‍यात जलयुक्त शिवार योजनेतून मोठी कामे करता आली. 

तालुक्‍यात आज चार-पाच लाख टन ऊस आहे. फळबागा, दूधधंद्यातून शेतकरी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय. वृद्धेश्वर दूध संघ, वृद्धेश्वर साखर कारखाना, खरेदी-विक्री संघ, पंचायत समिती, जिल्हा सहकारी बॅंक, पाथर्डी व शेवगाव पालिका, या सर्व संस्थांच्या माध्यमातून महिलांना विविध पदांवर संधी दिली. राजकारणात काम करण्यासाठी त्यांना मदतीचा हात पुढे केला.

हेही वाचा.. शेळके यांच्या रुपाने पारनेरला मानाचा तुरा

पंकजा मुंडे यांनी तालुक्‍याला निधी देताना परळी व पाथर्डी असा भेद केला नाही. भाजप सरकारच्या काळात 1100 कोटींचा निधी मतदारसंघात आणला. 
बचतगटांच्या माध्यमातून उद्योगासाठी जिल्हा बॅंकेकडून कर्जप्रकरणे मंजूर केली. मला घरातून सासूबाई मोहिनी राजळे यांची मिळालेली साथ मोलाची आहे. मतदारसंघाच्या प्रश्नांसोबतच महिलांच्या प्रगतीसाठी सतत काम करणार आहे. 

हेही वाचा..

"मुळा'तून वांबोरी चारीला पाणी सुरू 

तिसगाव : पाथर्डी तालुक्‍याच्या दुष्काळी भागाला जलसंजीवनी ठरणाऱ्या वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले असून, या चारीच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्‍यातील 39 गावांतील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. 

पाथर्डी, नगर व राहुरी तालुक्‍यांतील 50पेक्षा जास्त गावांतील 102 पाझर तलावांसाठी या भागाचे आमदार तथा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडले. पाथर्डीतील खांडगावपर्यंत योजनेचे पाणी पोचल्याची माहिती जालिंदर वामन यांनी दिली. चार महिन्यापूर्वी वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले होते; परंतु मुळा धरण भरल्यानंतर हे पाणी बोनस म्हणून सोडण्यात आल्याचे त्यावेळी मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले होते. पुन्हा एकदा फेब्रुवारीमध्ये पाणी सोडण्यात येईल, असे सांगितले होते. मुळातून या चारीसाठी शंभर दिवस पाणी उचलण्यात येईल. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख