आमदार लंके यांचे 25 लाखाचे पहिले बक्षिस राळेगणसिद्धी जिंकणार - MLA Lanka's first prize of Rs 25 lakh will be won by Ralegan Siddhi | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार लंके यांचे 25 लाखाचे पहिले बक्षिस राळेगणसिद्धी जिंकणार

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

ज्यांचा प्रथम आडीच वर्ष सरपंच त्याना चार जागा व नंतरच्या आडीच वर्षांसाठी ज्यांना संधी त्यांच्या पाच जागा मिळण्याची शक्यता आहे. उद्या हजारे यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत यावर शिक्का मोर्तब होणार आहे.

पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची कर्मभूमी असलेल्या राळेगणसिद्धीच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय आज झालेल्या एका बैठकित घेण्यात आला. आमदार निलेश लंके यांच्यासह गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सुपे येथे झाली.

नगर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आमदार निलेश लंके यांनी बिनविरोध निवडणूक करा, गावासाठी २५ लाख रूपयांचा निधी घ्या, असे आवाहन केले होते. आमदार लंके यांच्या या आवाहनाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तसेच आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी स्वागत केले होते. या निर्णयामुळे गावामधील भांडणे थांबतील व गावाच्या विकासाची घोडदौड सुरू होईल, असे मत हजारे व पवार यांनी व्यक्त केले होते. .

सुपे जिल्हा परिषदेच्या गटातील विविध गावांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका आज आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. सुपे गटात असलेल्या राळेगणसिद्धीचाही त्यात समावेश होता. राळेगणसिद्धीची बैठक सुरू झाली व काही वेळातच दोन्ही गटांनी बिनविरोध निवडणूक करण्याच्या निर्णयावर सहमती दर्शविली. या बैठकीस माजी सरपंच जयसिंग मापारी, लाभेश औटी, सुरेश पठारे, दत्ता आवारी हे प्रमुख कर्यकर्ते उपस्थित होते.

बिनविरोध निवडणुकीसंदर्भात मापारी, औटी, पठारे तसेच आवारी यांच्याशी संपर्क साधला असता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तसेच आमदार निलेश लंक यांनी निवडणूक बिनविरोध करून गावातील वाद टाळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. अण्णा सर्वांसाठीच मार्गदर्शक आहेत. आमदार लंके यांनीही अण्णांच्या विचारांशी सुसंगत भूमिका घेतल्याने आम्ही सर्वांनी हेवेेदावे विसरून एकमताने बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींमध्येही असाच निर्णय व्हावा, अशी अपेक्षा मापारी, औटी, पठारे तसेच आवारी यांनी व्यक्त केली. 

अण्णा हजारे यांना आनंद

सर्व कार्यकर्त्यांनी एकमताने निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतल्याबददल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आनंद व्यक्त केला. आमदार लंके यांनी राळेगणसिद्धीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती हजारे यांना दिल्यानंतर अण्णांनी सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. विविध गावांच्या कार्यकर्त्यांनी एकमताने निवडणुका बिनविरोध करण्याचा निर्णय घेऊन आदर्श निर्माण करण्याचे आवाहन हजारे यांनी केले.

राळेगणसिद्धीच्या या निर्णयामुळे तालुक्यासह महाराष्ट्र राज्यात चांगला संदेश जाईल, असे हजारे यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी सकाळी हजारे व आमदार लंके यांची राळेगणसिद्धीत बैठक होणार आहे.

अशी झाली दोन गटांत तडजोड

ज्यांचा प्रथम आडीच वर्ष सरपंच त्याना चार जागा व नंतरच्या आडीच वर्षांसाठी ज्यांना संधी त्यांच्या पाच जागा मिळण्याची शक्यता आहे. उद्या हजारे यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत यावर शिक्का मोर्तब होणार आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख