`रेमडेसिवीर`च्या पुरवठ्यासाठी आमदार जगताप यांचे मंत्री टोपे यांना साकडे - MLA Jagtap's minister to Tope for supply of 'Remedesivir' | Politics Marathi News - Sarkarnama

`रेमडेसिवीर`च्या पुरवठ्यासाठी आमदार जगताप यांचे मंत्री टोपे यांना साकडे

मुरलीधर कराळे
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

जिल्ह्यातील अत्यस्थ रुग्ण नगर शहरातील मोठ्या रुग्णालयांत दाखल होत आहेत. त्यामुळे बहुतेक रुग्णालयांचे कोविड बेड फुल असतात. त्यामुळे या इंजेक्शनची गरज नगर शहरात जास्त असते.

नगर : जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा अत्यल्प होत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयात रुग्णांवर उपचार करताना अडचणी येत आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांप्रमाणे हे इंजेक्शनचा पुरवठा त्वरीत उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना काल मुंबईत केली.

टोपे यांची आज मुंबईत भेट घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी त्यांना निवेदन दिले व जिल्ह्यातील वस्तुस्थितीची कल्पना दिली.या वेळी टोपे यांनी जगताप यांच्याशी चर्चा करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला.

जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे, की जिल्हा रुग्णालयातील रेमेडेसिवीर या इंजेक्शनचा साठा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माहितीनुसार संपला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये देखील या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे श्वसनाचा त्रास जाणवणाऱ्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले हे इंजेक्शन नगर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून द्यावे. 

इंजेक्शन उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांचा जीव या इंजेक्शन अभावी धोक्यात आला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यासाठी कोरोना रुग्ण संख्येच्या तुलनेत जास्तीत जास्त प्रमाणात  इंजेक्शनचा साठा उपलब्ध करुन द्यावा, अशी विनंती त्यांनी टोपे यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यातील रुग्ण नगर शहरात

जिल्ह्यातील अत्यस्थ रुग्ण नगर शहरातील मोठ्या रुग्णालयांत दाखल होत आहेत. त्यामुळे बहुतेक रुग्णालयांचे कोविड बेड फुल असतात. त्यामुळे या इंजेक्शनची गरज नगर शहरात जास्त असते. त्यामुळे शहरात शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांना या इंजेक्शनचा साठा आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख