नगर : जिल्ह्यातील खून, दरोडे यामुळे पोलिस प्रशासनाचा वचन राहिला नाही. महापालिका प्रशासन कोणतेच काम करीत नाहीत, अशा प्रशानांबाबत आमदार संग्राम जगताप यांनी आज महापालिका प्रशासन व पोलिस अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोरच झालेल्या या प्रकारामुळे अधिकाऱ्यांचीही बोलती बंद झाली.
पालकमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढाव बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, तसेच अधिकारी उपस्थित होते. आमदार जगताप यांनी सर्वांच्या समोर मागील चार महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांचा उहापोह करीत अधिकारी शुन्य काम करीत असल्याचे सांगितले.
जगताप म्हणाले, की नुकताच रेखा जरे यांचा खून झाला. महिलांवरील अत्याचार, खून, दरोडे होत आहेत. केडगावमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी लोकांना संरक्षण देण्याऐवजी त्यांना स्वतःचे संरक्षण स्वतःच करण्याची वेळ आली आहे. लोक गटागटाने रात्री गस्त घालतात. मग पोलिस काय करतात. महानगरपालिकेत अशी परिस्थिती आहे, तर ग्रामीण भागात कशी परिस्थिती असेल. दरोडे होत असताना पोलिसांकडून तातडीने दखल घेतली जात नाही. पोलिसच तक्रार देऊ नका, असे सांगतात. तक्रारदारांची तक्रार घेऊन पोलिसांनी तपास करण्याऐवजी त्यांच्याच मागे तपासणीचा ससेमीरा लावला जातो.
महापालिका प्रशासनाबाबत बोलताना जगताप यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, लहान-मोठे प्रश्न विधानसभेत मांडण्याची गरज नाही. जिल्हा पातळीवर अशा प्रश्नांची सोडवणूक व्हायला हवी. नॅशनल हायवेवरही पार्किंग असते. मोकाट जनावरे रस्त्यावर बसतात. हे प्रशासनाला दिसत नाही का. महापालिका प्रशासन काय करते. जिल्हाधिकारी कार्यालयाचा रस्ता आम्ही मंजूर करून घेतला. त्यासाठी आंदोलने केली. निधी नसता तर ठिक, परंतु निधी असूनही या रस्त्याचे काम का होत नाही. जिल्हाभरातून लोक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येतात. अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागते. ही गंभीर बाब आहे.
याबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांनी संबंधित प्रश्नांबाबत ताडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. महाराष्ट्रात कोरोनाला रोखण्यासाठी सरकारला यश येत आले असली, तरी लोकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

