अकोले : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आपणाला मारहाण केल्याची तक्रार खडकी बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे शिपाई रामदास लखा बांडे यांनी राजूर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार राजूर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारीत म्हटले आहे, की काल (ता. 17) बांडे हा खडकी बुद्रुक येथे दुपारी गावात दत्त मंदिराजवळ पायी जात असताना मागून आमदार डॉ. किरण लहामटे यांची गाडी जोरात येऊन कट मारून गेली. त्यावेळी आम्हाला वाटले पर्यटक आहेत, म्हणून गाडी हळू चालवा, असे ओरडून सांगितले. असे म्हटल्याचा राग येऊन आमदार गाडी थांबवून गाडीच्या खाली उतरले. आणि म्हणाले, की मला ओळखले का, मी कोण आहे. असे रागावून त्यांनी माझ्या पोटात व छातीत लाथ मारून मला शिवीगाळ केली व गाडीत बसून निघून गेले. त्यामुळे त्याच्या विरोधात माझी कायदेशीर फिर्याद आहे.
या वेळी त्यांच्यासोबत मनोहर सखाराम भांगरे होते. राजूर पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली असून, अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे पडसाद उमटले आहे.
असे काही झालेच नाही
आमदार डाॅ. लहामटे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही, तथापि, स्थानिक माध्यमाशी बोलताना त्यांनी अशी घटना घडली नसून, विरोधकांनी मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
भाजपकडून निषेध
दरम्यान, या घटनेचा भाजपकडून निषेध होत आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी या घटनेचा निषेध करून चौकशीची मागणी केली आहे.
Edited By - Murlidhar Karale

