आमदार आशुतोष काळे यांचे मकाप्रश्नी छगन भुजबळ यांना साकडे - MLA Ashutosh Kale's maize issue to Chhagan Bhujbal | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार आशुतोष काळे यांचे मकाप्रश्नी छगन भुजबळ यांना साकडे

मनोज जोशी
गुरुवार, 7 जानेवारी 2021

काळे यांनी मंत्री भुजबळ यांची भेट घेऊन मतदारसंघात पुन्हा शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत निवेदन दिले. चालू हंगामात समाधानकारक पावसामुळे मका पिकाचे उत्पादन वाढले. त्यामुळे बाजारभाव पडले.

कोपरगाव : तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या मक्‍याला किमान आधारभूत किंमत मिळावी, यासाठी महाविकास आघाडी सरकारने शासकीय खरेदी केंद्रे सुरू केली. बाजार समित्यांच्या माध्यमातून ही खरेदी सुरू झाली. मात्र, सर्व शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यापूर्वीच केंद्रे बंद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शासनाने तातडीने मका खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करावीत, असे साकडे आमदार आशुतोष काळे यांनी अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना घातले. 

काळे यांनी मंत्री भुजबळ यांची भेट घेऊन मतदारसंघात पुन्हा शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत निवेदन दिले. चालू हंगामात समाधानकारक पावसामुळे मका पिकाचे उत्पादन वाढले. त्यामुळे बाजारभाव पडले. अशा वेळी चिंतेत सापडलेल्या मकाउत्पादकांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने शासकीय दराने मका खरेदीचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना मकाचे योग्य दर मिळत होते. मात्र, शासनाने 16 डिसेंबर रोजी अचानक केंद्र बंद करण्यात आले. मात्र, आजही अनेक शेतकऱ्यांकडे मका बाकी आहे. केंद्र बंद झाल्याने मकाउत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यासाठी ही मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावेत. तसेच 16 डिसेंबर रोजी बाजार समितीत खरेदी केलेल्या मक्‍याची लॉट एन्ट्री व्हावी. मकाखरेदीचे पोर्टल बंद झाल्याने 7 शेतकऱ्यांची 3 लाख 35 हजार 775 रुपये खरेदीची लॉट एन्ट्री झालेली नसून, ती करण्यात यावी, अशी मागणी काळे यांनी केली आहे. 

 

हेही वाचा...

"संजीवनी एमबीए'च्या 32 विद्यार्थ्यांना नोकऱ्या 

 कोपरगाव : संजीवनी एमबीए विभागाच्या अंतिम वर्षातील 32 विद्यार्थ्यांना एकाच वेळी नामंकित कंपन्यांत नोकरी मिळाली. या सर्वांना वार्षिक साडेपाच लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले. संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना ही संधी मिळाल्याचे संजीवनी शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी सांगितले. 
ते म्हणाले, की संजीवनी एमबीए विभागाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने टीसीएस, बर्जर पेंट, इटामॅक्‍स, ओम लॉजिस्टिक्‍स, स्ट्रेट स्ट्रीट एचसीएल, ऍटोस सिन्टेल, एक्‍सा बिझिनेस या कंपन्यांत 32 विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. त्यातील बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. टीसीएस कंपनीने अनिकेत रावसाहेब आहेर व ऋषिकेश बाळासाहेब गायकवाड यांनी सुरवातीलाच सुमारे 5.79 लाख वार्षिक पॅकेज देऊ केले. बर्जर कंपनीने शुभम विश्वनाथ बोरखडे यास 5.75 लाखांचे पॅकेज दिले. इतर विद्यार्थ्यांनाही असेच वार्षिक पॅकेज मिळाले आहे. अन्य विद्यार्थ्यांनी पारंपरिक व्यवसाय सांभाळत उद्योजक होणे पसंद केले. 
राज्यातील बऱ्याच व्यवस्थापन महाविद्यालयांचे व्यवस्थापनशास्त्र कोलमडलेले असताना, संजीवनी एमबीए विभागाने उद्योगजगताला कसे मनुष्यबळ लागते, हे हेरले. केवळ पुस्तकी शिक्षणातून उद्योगजगताच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही, हे लक्षात घेतले. त्यानुसार उद्योगजगताला आवश्‍यक शिक्षण दिले. या विद्यार्थ्यांचे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्‌चे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी अभिनंदन केले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख