हे तर तालुक्याचे दुर्भाग्य ! आमदार लहामटे यांच्या आंदोलनावर पिचड यांनी साधला निशाणा - This is the misfortune of the taluka! Sadhana Nishana on MLA Lahamate's agitation | Politics Marathi News - Sarkarnama

हे तर तालुक्याचे दुर्भाग्य ! आमदार लहामटे यांच्या आंदोलनावर पिचड यांनी साधला निशाणा

शांताराम काळे
बुधवार, 22 जुलै 2020

निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम काल आमदार डाॅ. लहामटे यांनी बंद पाडले. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष सरकारमधील महत्त्वाचा पक्ष असताना त्यांच्या आमदारांवर आंदोलन करण्याची वेळ येते, याबाबत वैभव पिचड यांनी आज निशाणा साधला.

अकोले : निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामांबाबत यापूर्वीच काही निर्णय झालेले आहेत. काम सुरू असताना शेतकऱ्यांच्या पाइपलाइन तुटल्यास तातडीने दुरुस्ती करून देणे, अधिग्रहित जमिनीचा योग्य मोबदला देणे या गोष्टी आधीच ठरलेल्या आहेत. केवळ अंमलबजावणी प्रभावीपणे होण्याची गरज आहे. या प्रश्नी सरकारमधील लोकप्रतिनिधीला आंदोलनाची वेळ येते, ठेकेदारांकडून शेतकऱ्यांना वेठीस धरणे, हे अकोले तालुक्याचे दुर्भाग्य आहे, अशा शब्दांत भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांचा नाव न घेता समाचार घेतला.

निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम काल आमदार डाॅ. लहामटे यांनी बंद पाडले. शेतकऱ्यांच्या फुटलेल्या पाइपलाइन तातडीने दुरुस्त केल्या नाही, तर काम होऊ देणार नाही, अशी भूमिका आमदारांनी घेतली. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष सरकारमधील महत्त्वाचा पक्ष असताना त्यांच्या आमदारांवर आंदोलन करण्याची वेळ येते, याबाबत पिचड यांनी आज निषाणा साधला.

ते म्हणाले, कॅनाॅलचे खोदकाम करण्याआगोदर पूल बांधण्याचे तसेच मोऱ्या टाकण्याचे काम प्रथम झाले पाहिजे. शेतीकडे जाण्याचा मार्ग जर रोखला, तर शेतकऱ्यांना जाण्यायेण्यासाठी तसेच मालवाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण होईल. मालाचे नुकसान झाल्यास ठेकेदार व अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येील, याचा विचार संबंधित खात्याने करायला हवा. जितकी जमीन अधिग्रहित केली आहे, त्यापेक्षा अतिरिक्त खोदकाम करणे, तसेच अधिग्रहित जमिनीतही गरज नसताना शेतकऱ्यांना त्रास देणे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. ज्ाय शेतकऱ्यांच्या विहिरी, घरे, गोठे, चाळी या कामात गेल्या असतील, तसेच जे शेतकरी भूमिहीन झाले आहेत. त्यांच्या परिवारातील व्यक्तीला नोकरीस रुजू करून घेणे, याबाबत यापूर्वीच चर्चा झालेली आहे. त्याची लवकर अंमलबजावणी या सरकारने केली पाहिजे. 

आमदारांनी आंदोलनाचा फार्स करू नये : सीताराम भांगरे

आमदारांनी कालवे बंद पाडण्यापेक्षा सरकार दरबारी आपले वजन वापरून एक नव्हे सर्व 14 महत्त्वाचे प्रश्न सोडवावेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकित या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मंजुरी देण्यात आली होती. आता महाआघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देऊ नये. आमदारांनी केवळ आंदोलनाचा फार्स करू नये, तर ते प्रश्न सोडवून दाखवावेत, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख