नगर महापालिकेत लक्ष घालण्यापूर्वीच मंत्री शंकरराव गडाख यांना दणका - Minister Shankarrao Gadakh was hit before he could pay attention to the Municipal Corporation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

नगर महापालिकेत लक्ष घालण्यापूर्वीच मंत्री शंकरराव गडाख यांना दणका

मुरलीधर कराळे
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

स्थायी समितीच्या निवडणुकीत त्यांना राजकीय खेळी खेळता आली नाही. भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने खेळी करीत शिवसेनेला पुन्हा एकाकी पाडल्याचे चित्र नगर महापालिकेत झाले आहे.

नगर : राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर त्यांनी नगर शहरातील शिवसेना बळकट करण्यासाठी लक्ष घालण्यास प्रारंभ केला. परंतु स्थायी समितीच्या निवडणुकीत त्यांना राजकीय खेळी खेळता आली नाही. भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने खेळी करीत शिवसेनेला पुन्हा एकाकी पाडल्याचे चित्र नगर महापालिकेत झाले आहे.

नगरमध्ये शिवसेनेचा चेहरा म्हणून दिवंगत नेते अनिल राठोड यांच्याकडे पाहिले जात होते. मागील काही दिवसांपूर्वी राठोड यांचे निधन झाल्यामुळे नगर शिवसेनेचा नवीन वाघ कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. दरम्यानच्या काळात मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. गडाख शिवसेनेत आल्यामुळे आता ते नगर शहरातील शिवसेनेला बळ देतील, असे वाटत होते. अर्थात मागील पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी नगरमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आगामी व्यूहरचनेबाबत चर्चा केली. त्यातच आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापाैर व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू करण्याचे सुतोवाच गडाख यांनी केले होते. त्यामुळे शिवसेना अधिक भक्कम होणार, अशीच चर्चा सुरू झाली.

महापालिकेत शिवसेनेचे जास्त नगरसेवक असतानाही राष्ट्रवादीच्या खेळीने महापाैर हातचे जाऊन भाजपच्या गळाला लागले. शहरात शिवसेनेचे नगरसेवक जास्त होतात, तर महापाैर का नको, अशीच अटकळ कार्यकर्त्यांनी घातली होती. तसेच स्थायी समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्यावतीने गडाख लक्ष घालतील, असे वाटत होते, मात्र भाजप व राष्ट्रवादीच्या खेळीपुढे त्यांचे काहीच चालले नाही, असेच चित्र सध्या निर्माण झाले आहे.

नगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक शुक्रवारी होणार आहे. त्यासाठी आज उमेदवारी अर्ज भरण्यात आले. भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांचा उमेदवारी अर्ज भाजपकडून भरावयाचा होता, तथापि, ऐनवेळी त्यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केला. भाजपच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर स्थायीच्या सभापतीपदासाठी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे किती उचित आहे, भाजप त्यांच्यावर कारवाई करणार नाही का, असे प्रश्न उपस्थित होत असतानाही कोतकर यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीकडून अर्ज भरून भाजला दणका दिला. प्रत्यक्षात कोतकर हे पूर्वी राष्ट्रवादीतच होते. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे ते निष्ठावान कार्यकर्ते म्हणून मानले जातात. महापालिका निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी भाजपमध्ये जाऊन नगरसेवकपद मिळविले असले, तरी त्यांना आमदार जगताप यांचीच साथ होती, असे म्हटले जाते. साहजिकच महापाैर निवडीच्या वेळी भाजपला राष्ट्रवादीने साथ देत भाजपचा महापाैर झाला. आमदार जगताप यांनी पक्षश्रेष्ठींचा विरोध पत्कारून भाजपला पाठिंबा दिला. म्हणजेच महापाैर भाजपचा असला, तरी आमदार संग्राम जगताप यांच्या इशाऱ्यावरच सत्तेची घोडदाैड सुरू असते, हे वेगळे सांगणे नको.

स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेच्यावतीने नगरसेवक योगिराज गाडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी शिवसेनेचे 5 सदस्य आहेत. भाजपचा उमेदवारच राष्ट्रवादीने पळविला असल्याने ऐनवेळी भाजप कोणाला उभे करणार, हे लवकरच दिसून येणार आहे. हे सर्व आमदार जगताप यांच्याच इशाऱ्यावरून झाले असल्याचे बोलले जाते. यापूर्वी भाजपला केलेल्या मदतीची परतफेड भाजप करू शकते. राष्ट्रवादीत गेलेल्या उमेदवाराला भाजपचे नगरसेवक मदत करू शकतात. या सर्व घडामोडीत शिवसेनेला भाजपचे मते मिळविणे केवळ अशक्यच होणार असे दिसते. त्यामुळे राजकारणाच्या डावात गडाख यांना पहिलाच दणका दिल्याचे मानले जाते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख