मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या गावात सात दिवस "बंद' - Minister Prajakta "closed" for seven days in Tanpur's village | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या गावात सात दिवस "बंद'

विलास कुलकर्णी
रविवार, 4 एप्रिल 2021

शहरात 127 ऍक्‍टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. कोरोनामुळे मृत्यू वाढले आहेत. त्यामुळे, सर्वांनी एकमताने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. दूध डेअऱ्या सकाळी व संध्याकाळी एक तास सुरू राहतील. मेडिकल दुकाने, दवाखाने चालू राहतील.

राहुरी : शहरातील व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्था, डॉक्‍टर, नगरसेवक, शासकीय अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत गुरुवारपासून (ता. 9) शहरात सात दिवस कडकडीत लॉकडाउन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. 

राहुरी पालिकेच्या सभागृहात मंत्री तनपुरे यांच्या उपस्थितीत आज (रविवारी) बैठक झाली. या वेळी तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके, नीरज बोकील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख, किरण सुराणा, राजेंद्र सिन्नरकर, डॉ. जयंत कुलकर्णी, डॉ. प्रवीण कोरडे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. दीपाली गायकवाड, रिपाइंचे विलास साळवे, बाळासाहेब जाधव, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, अनिल कासार, अशोक आहेर, संजय साळवे, बाळासाहेब उंडे, मुख्य अधिकारी श्रीनिवास कुरे उपस्थित होते. 

तनपुरे म्हणाले, ""शहरात 127 ऍक्‍टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. कोरोनामुळे मृत्यू वाढले आहेत. त्यामुळे, सर्वांनी एकमताने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. दूध डेअऱ्या सकाळी व संध्याकाळी एक तास सुरू राहतील. मेडिकल दुकाने, दवाखाने चालू राहतील. गोरगरीब नागरिकांचे हाल होऊ नयेत, यासाठी शहरात रेशनिंगचे धान्य तत्काळ वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वयंसेवी संस्थांनी गरिबांना धान्य पुरवठा करण्यास पुढाकार घेतला आहे. त्यांना व्यापारी संघटना हातभार लावणार आहेत. 

बालाजी मंदिर येथील कोरोना केअर सेंटर पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे,'' असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले. 

हेही वाचा... 

निंबळक दहा दिवस बंद 

नगर : कोरोनाचा वाढता संसर्ग वाढत असल्यामुळे निंबळक (ता. नगर) येथील ग्राम सुरक्षा समितीने दहा दिवसांचे लॉकडाउन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. चौदा तारखेपर्यंत गाव बंद राहणार असून सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंतच दुकाने उघडे राहणार आहे. त्यानंतर अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहे, अशी माहिती सरपंच प्रियंका लामखडे यांनी दिली . 

निंबळकमध्ये कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. यावर नियत्रंण आणण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या उपस्थितीत समितीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 

या वेळी उपसरपंच बाळासाहेब कोतकर , घनश्‍याम म्हस्के , भाऊराव गायकवाड सोमनाथ खांदवे , समीर पटेल , तलाठी , आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. 
निंबळक गावाजवळच एमआयडीसी असल्याने कामावर जाणाच्या कामगार वर्गाची संख्या जास्त आहे. गावामधून परिसरातील सहा ते सात गावांमधून नागरिकांची निंबळक मार्गे रहदारी चालू असते. कंपनीतून सुटल्या नंतर कामगार भाजीपाला, किराणा तसेच इतर साहित्य घेण्यासाठी येथील मुख्य चौकात मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. बहुतेक नागरिक मास्क न वापरता फिरत आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख