मंत्री गडाखांचा पाठपुरावाच भारी ! नेवासे तालुक्यातील रस्त्यांसाठी मिळविले शंभर कोटी - Minister Gadakh's pursuit is huge! Nevasa got Rs 100 crore for roads | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्री गडाखांचा पाठपुरावाच भारी ! नेवासे तालुक्यातील रस्त्यांसाठी मिळविले शंभर कोटी

सुनील गर्जे
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

गेल्या काही वर्षांत नेवासे तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची दूरावस्था झाल्याने लोकांमध्ये मोठा असंतोष धगधगत होता.

नेवासे  : तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर चांगलेच यश आले आहे. नेवासे तालुक्यातील पाचेगांव ते चिलेखनवाडीसह महत्वाच्या सर्व रस्त्यांसाठी तब्बल शंभर कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने तालुक्यातील रस्त्यांना 'अच्छे दिन' आले आहेत. यामुळे संपूर्ण तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे.

गेल्या काही वर्षांत नेवासे तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची दूरावस्था झाल्याने लोकांमध्ये मोठा असंतोष धगधगत होता. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने तालुक्यातील लोकांनी प्रामुख्याने या प्रश्नाकडे तत्कालीन अपक्ष उमेदवार गडाख यांचे लक्ष वेधून रस्त्यावरील खड्ड्यांच्या साडेसातीतून सुटका करण्याचे साकडे घातले होते. त्यावेळी हा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्याचे वचन गडाख यांनी दिले होते. 

मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पाळण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वचनपूर्ती करण्यात अडचणी निर्माण झाल्या. दरम्यान, लॉकडाऊन शिथील होताच राज्याचे कॅबिनेट मंत्री बनलेल्या गडाख यांनी तालुक्यातील सर्व महत्वाच्या रस्ता कामांचा आराखडा बनविण्याचे आदेश देऊन त्यास प्रशासकीय मंजूरीही मिळविली होती. मात्र प्रत्यक्ष कामास निधी मिळण्यासाठी त्यांना सातत्यपूर्ण मोठा पाठपुरावा करावा लागला.

या रस्त्यांसाठी मिळाला निधी

मंत्री शंकरराव गडाख यांच्या पाठपुराव्यास अखेर यश मिळाले असून, तालुक्यातील सर्व महत्वाच्या रस्ता कामांसाठी थोडा न थिडका तब्बल शंभर कोटी रुपयांचा भरभक्कम निधी मिळविण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यातील तब्बल 56 कोटी 52 लाख रुपये एकट्या श्रीरामपूर-शेवगांव राज्य मार्गावरील पाचेगांव फाटा ते कुकाणा दरम्यानच्या साडेतेहतीस किलोमीटर रस्ता कामासाठी मिळाले आहेत. त्याचबरोबर सोनई ते घोडेगाव (नगर-औरंगाबाद महामार्ग) या रस्ता कामासाठी 6 कोटी 40 लाख, खडका फाटा ते तुळजाईवाडी रस्ता कामासाठी 2 कोटी 50 लाख, सलाबतपूर-शिरसगांव ते गोपाळपूर-खामगांव या रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी 50 लाख, तामसवाडी-धनगरवाडी ते खुपटी रस्ता कामासाठी 2 कोटी रुपये, मोरेचिंचोरे ते सोनई रस्ता कामासाठी 2 कोटी 50 लाख, वडाळा बहिरोबा ते रांजणगांव रस्त्यावरील कॅनालपासून ते कारेगांव पर्यंतच्या रस्ता कामासाठी 2 कोटी 30 लाख, कारेगांव ते सौंदाळा (राज्य मार्ग 50) कामासाठी 2 कोटी, सोनई अर्बन बँक ते विवेकानंद चौक रस्ता काँक्रीटीकरणासाठी 88 लाख रुपये, दहीगांव-कुकाणा मार्गावरील शेवगांव हद्द ते कुकाणा या रस्ता कामासाठी 1 कोटी 76 लाख रुपये, जळके बुद्रुक ते गोगलगांव रस्ता 50 लाख, नेवासा-हंडीनिमगांव ते भानसहिवरा रस्ता 2 कोटी 40 लाख, भानसहिवरे ते रांजणगांवदेवी रस्ता 2 कोटी 50 लाख, रांजणगांवदेवी ते घोडेगांव-कुकाणा रस्ता 2 कोटी 50 लाख, करजगांव ते देवखिळे वस्ती रस्ता 2 कोटी 40 लाख, माका ते पाचुंदा रस्ता 2 कोटी 10 लाख, प्रजीमा 31 लोहोगांव, प्रजीमा 35 शिंगवेतुकाई, लोहारवाडी, चांदा ते रामा 66 रस्ता (प्रजीमा 183) किमी 0/00 ते 5/00 यामध्ये सुधारणा करणे 2 कोटी 40 लाख, चांदा ते रस्तापूर रस्ता 1 कोटी 26 लाख, सोनई-शनिशिंगणापूर, चांदा रस्ता (प्रजीमा 79) किमी 10/00 ते 11/400 मध्ये सुधारणा करणे (चांद्यापर्यंत) 1 कोटी 20 लाख, असा तब्बल शंभर कोटींचा भरभक्कम निधी प्राप्त झाला असून येत्या काही दिवसांतच या रस्त्य़ांच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे. 

काम लवकर सुरू व्हावे

"तालुक्यात घरपोच गॅस वितारणसाठी रस्त्याची मोठी समस्या भेडसावत होती.  तालुक्यातील मुख्य व  अंतर्गत रस्त्यांसाठी शंभर कोटीचा निधी मिळाल्याने समाधान वाटले. लवकरच काम सुरू व्हावे, अशी अपेक्षा ऑल इंडिया गॅस डिस्ट्रोब्यूशन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण इंगळे यांनी व्यक्त केली.

तालुक्यात समाधानाचे वातावरण

तालुकातर्गत  गावोगावी जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची समस्या गेल्या काही वर्षांपासून भेडसावत होती. ही समस्या मंत्री शंकरराव गडाखांमुळे दूर होणार असल्याने संपूर्ण तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे, असे मत नेवासे तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष दिनकर गर्जे यांनी व्यक्त केले.

मोठी समस्या दूर होईल

कुकाणेहुन नेवासे, श्रीरामपूरकडे तसेच तालुक्यांतर्गत रस्त्यांची दुरवस्थेमुळे प्रवाशांसह वाहनचालकांना होणारा त्रास, वाहनांचेही मोठे  नुकसान होत होते. मंत्री गडाखांमुळे तालुक्यातील  रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागल्याने खूप मोठी व महत्वाची समस्या मिटणार आहे, असे वाहन चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष युनूस नालबंद यांनी सांगितले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख