सोनईत दोन गडाखांच्या लढतीत मंत्री शंकरराव गडाखांचा डंका - Minister Gadakh's fight in the battle of two Gadaks in Sonai | Politics Marathi News - Sarkarnama

सोनईत दोन गडाखांच्या लढतीत मंत्री शंकरराव गडाखांचा डंका

विनायक दरंदले
सोमवार, 18 जानेवारी 2021

जिल्ह्यात मोठी उत्सुकता लागलेल्या सोनई ग्रामपंचायत निवडणुकीत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाने 17 पैकी 16 जागा जिंकत भगवा फडकला आहे.

सोनई : जिल्ह्यात मोठी उत्सुकता लागलेल्या सोनई ग्रामपंचायत निवडणुकीत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाने 17 पैकी 16 जागा जिंकत भगवा फडकला आहे. माजी खासदार तुकाराम गडाख गटाला अवघी एक जागा मिळाली आहे. 

दोन गडाखातील ही लढत मोठी अटीतटीची होईल, असा अंदाज सुरवातीला व्यक्त होत होता. मात्र प्रत्यक्ष निकालानंतर मंत्री गडाख गटाने सरशी केली आहे. माजी खासदार गडाख दहा वर्षानंतर राजकीय मैदानात उतरले होते. त्यांनी सर्व प्रभागात मतदारांची गळाभेट घेत सभा घेतली होती. सभेत आश्वासनांचा पाऊस पाडूनही त्यांच्या प्रकाश शेटे गटाला अवघी एक जागा जिंकता आली आहे.

मंत्री गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख व युवानेते उदयन गडाख यांनी किल्ला लढवत सतरा पैकी सोळा जागा जिंकून आणल्याने कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे.

विजयी उमेदवार याप्रमाणे : नवनाथ दरंदले, श्वेताली दरंदले, सवित्रा ओहळ, धनंजय वाघ, सुरेखा पवार, जयश्री तागड, सविता राऊत, किशोर वैरागर, प्रसाद हारकाळे, इम्तेसाम सय्यद, भानुदास कुसळकर, मच्छिंद्र कुसळकर, विद्या दरंदले, राजेंद्र बोरुडे, प्रभाकर गडाख, अलका राशिनकर (सर्व जगदंब मंडळ), शोभा शेटे (ग्रामविकास मंडळ).

 

हेही वाचा...

नागवडेंच्या जन्मदिनी व्याख्यानांची मेजवानी 

श्रीगोंदे : राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या 87व्या जन्मदिनानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 19 ते 21 जानेवारीदरम्यान व्याख्यानमाला होणार असल्याची माहिती नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली. 

ते म्हणाले, की लोकनेते सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे प्रतिष्ठानातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. गेली 12 वर्षे अखंडपणे व्याख्यानमाला सुरू आहे. व्याख्यानमालेचे हे 13वे वर्ष आहे. यापूर्वी राज्यातील नामवंत विचारवंतांनी व्याख्यानमालेची पुष्पे गुंफली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची व्याख्यानमाला होत आहे. त्यानुसार, मंगळवारी (ता.19) सकाळी 10 वाजता आदर्शगाव पाटोद्याचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे "माणसात देव आहे' या विषयावर व्याख्यान होणार आहे. तत्पूर्वी रक्तदान शिबिर होणार असून, त्याचे उद्‌घाटन अनुराधा नागवडे यांच्या हस्ते होणार आहे. 

बुधवारी (ता.20) "महाराष्ट्र काल, आज आणि उद्या' विषयावरील दुसरे पुष्प माध्यम व शिक्षणतज्ज्ञ सचिन तायडे गुंफणार आहेत. व्याख्यानमालेत गुरुवारी (ता.21) उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांचे "आनंदी जीवनाची गुरूकिल्ली' या विषयावर व्याख्यान होईल. त्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभारी प्राचार्य सतीश सूर्यवंशी, उपप्राचार्य एस. एन. उंडे, निरीक्षक सचिन लगड व विश्वस्त मंडळाने केले आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख