मंत्री गडाख यांच्या प्रयत्नाला यश ! नेवासे तालुक्यासाठी तीन कोटी मंजूर - Minister Gadakh's efforts succeed! Three crore sanctioned for Nevasa taluka | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

मंत्री गडाख यांच्या प्रयत्नाला यश ! नेवासे तालुक्यासाठी तीन कोटी मंजूर

सुनिल गर्जे
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

नेवाशाच्या विकासासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने तीन कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती मंत्री गडाख यांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला दिली.

नेवासे : नेवासे शहरातील व तालुक्यातील विविध विकासकामांचा बॅकलाॅग भरून काढण्यासाठी राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे आमदार झाल्यापासून प्रयत्न सुरू होते. मंत्री झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवर `वजन` अधिक वाढले. त्यामुळे तब्बल पावणे आठ कोटींचा तालुक्याच्या विकासाचा प्रस्ताव त्यांनी तयार केला. त्याचा पहिला टप्पा 3 कोटी रुपये मंजूर झाले आहे. 

ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर तालुक्‍याचे गडाख यांनी नेवासे शहराच्या विकासासाठी हा निधी उपलब्ध करीत, नेवासेकरांना शहरविकासाचे "दसरा गिफ्ट' दिले. नेवासे शहरवासीयांनी हा भरीव निधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करीत मंत्री गडाखांचे आभार मानले. 

नेवाशाच्या विकासासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने तीन कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती मंत्री गडाख यांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला दिली.

ते म्हणाले, ""कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेवासे शहरातील विकासाची प्रक्रिया थांबू नये, यासाठी आपण शासनदरबारी सात कोटी 89 लाख 42 हजारांच्या निधीची मागणी केली होती. पैकी पहिल्या टप्प्यात तब्बल तीन कोटींचा भरीव निधी उपलब्ध झाल्याने, मंजूर निधीतून शहरातील विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. नेवासे शहरातील नागरिकांना या निधीतून मूलभूत सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. उर्वरित निधीदेखील लवकरच मंजूर होणार आहे. येणाऱ्या काळातही विविध योजनांतर्गत शहरासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यात येणार आहे. त्यासाठी शासनदरबारी शहरविकासाचे अनेक प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.'' 

दरम्यान, मागील पंचवार्षिकमध्ये हा मतदारसंघ भाजपकडे होता. राज्यातही भाजपचीच सत्ता होतील, असे असतानाही भाजपच्या आमदारांकडून विशेष कामे झाली नसल्याची तक्रार नागरिकांमधून होत होती. त्याचाच परिणाम म्हणजे मागील वर्षी सत्तांतर झाले. विधानसभा निवडणुकीत गडाख मोठ्या मताधिक्याने निवडून आले. शिवसेनेच्या नेत्यांशी त्यांचे मित्रत्त्वाचे संबंध होते. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री गडाख यांचे वडील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मित्रत्त्वाचे संबंध सर्वश्रूत आहेत. त्याचाच फायदा शंकरराव गडाख यांना झाला. हा मोठा निधी आणण्यात गडाख यशस्वी झाले. एका वर्षात काही आमदारांनी आपापल्या मतदारसंघात काही कामे केले. काहींनी जाहिरातबाजी केली. कोरोनाग्रस्तांना मदत, गरजुंना किराणा वाटप केले. काही नेत्यांनी चमकोगिरी केली. मात्र गडाख यांनी या आराखड्याची काहीच वाच्यता न करता मंजूर झाल्यानंतरच त्याचा `स्फोट` केला. आधी केले मग सांगितले, या युक्तीप्रमाणे त्यांनी अचानक हा निधी मंजूर झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे नेवासे तालुक्याच्या दृष्टीने हे मोठे गिफ्ट ठरले आहे.

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख