मंत्री गडाखांमुळे मिळाले बळ ! जिल्हा बॅंकेत `एन्ट्री`साठी शिवसेना नेत्यांकडून उमेदवारी - Minister Gadakhan gives strength! Shiv Sena ready to make entry in District Bank | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्री गडाखांमुळे मिळाले बळ ! जिल्हा बॅंकेत `एन्ट्री`साठी शिवसेना नेत्यांकडून उमेदवारी

मुरलीधर कराळे
सोमवार, 25 जानेवारी 2021

अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेत या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेने एन्ट्री करण्यासाठी विविध मतदारसंघातून अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी, काॅंग्रेस यांच्याबरोबर शिवसेनाही सक्रीयपणे रिंगणात उतरणार आहे.

नगर ः अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेत या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेने एन्ट्री करण्यासाठी विविध मतदारसंघातून अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी, काॅंग्रेस यांच्याबरोबर शिवसेनाही सक्रीयपणे रिंगणात उतरणार आहे.

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्यावतीने खासदार सदाशिव लोखंडे यांचे पूत्र चेतन लोखंडे यांनी अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून, अनिता रमाकांत गाडे यांनी महिला राखीव मतदार संघातून, माजी महापौर भगवान फुलसौंदर इतर मागासवर्गीय मतदार संघातून, तर पारनेर सेवा सोसायटी मतदार संघातून रामदास भोसले यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दिग्वीजीय आहेर यांच्याकडे दाखल केले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, अनिल शिंदे, संतोष गेनप्पा, गणेश कवडे, काशिनाथ दाते, दत्ता जाधव आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा बॅंकेत संचालक असणे आवश्यक

नगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये कायमच शिवसेनेच्यावतीने सहकार्य केले आहे. शेतकर्‍यांची बँक म्हणून या बँकेकडे पाहिले जाते. त्यामुळे शिवसेनेने कधीही या बँकेबाबत राजकारण केले नाही. राज्यात शिवसेना सत्ताधारी पक्ष आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतही शिवसेनेचे संचालक असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या कारभारात आता शिवसेनाही सक्रीय आहे. त्यासाठीच आता शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे. या उमेदवारांना अनेकांचे पाठबळ मिळणार असल्याने ते विजयी होतील, असा विश्‍वास शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले.

ग्रामीण भागात शिवसेेनेला चांगला पाठिंबा

या वेळी प्रा.शशिकांत गाडे म्हणाले, की राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता आहे. राज्य सरकारच्या अनेक योजना जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांपर्यंत पोहचविल्या जातात. ग्रामीण भागातील नागरिकांचा शिवसेनेला पाठिंबा मिळत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेने भरघोस यश मिळविलेले आहे.

कर्जमाफीसाठी शिवसेनेने आंदोलन केले होते

या वेळी भगवान फुलसौंदर म्हणाले, शेतकर्‍यांचे, नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शिवसेना कायमच तत्पर असते. शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन केले गेले. त्यामुळेच शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली होती. शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्हा बँकेत शिवसेनेचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे, त्यासाठी या निवडणुकीत शिवसेना सक्रिय उतरली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख