Minister Gadakh is happy with Popatrao Pawar's work and will take this decision for the villages in Maharashtra | Sarkarnama

पोपटराव पवार यांच्या कामावर मंत्री गडाख खूष, महाराष्ट्रातील गावांसाठी हा घेणार निर्णय 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 जून 2020

महाराष्ट्रातील गावांचा विकास करण्याबाबत दोघांत चर्चा झाली. हिवरे बाजारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गावांचा विकास होण्यासाठी महाराष्ट्र शासन अशा गावांमागे खंबीरपणे उभे राहिल.

नगर : आदर्शगाव हिवरे बाजार येथे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी भेट देवून कामाची पाहणी केली. राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या कामाचे काैतुक करून दोघांत बैठक झाली. महाराष्ट्रातील गावांचा विकास करण्याबाबत दोघांत चर्चा झाली. हिवरे बाजारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गावांचा विकास होण्यासाठी महाराष्ट्र शासन अशा गावांमागे खंबीरपणे उभे राहिल, असे आश्वासन मंत्री गडाख यांनी दिले.

पोपटराव पवार यांनी गडाख यांचे स्वागत केले. गडाख यांनी आदर्श गाव हिवरेबाजार येथील वनक्षेत्राची, सिमेंट बंधाऱ्याची पाहणी केली. तसेच लॉकडाऊन कालावधीत झालेल्या जमीन सपाटीकरण कामाला व यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र इमारत कामाला भेट दिली. तेथील कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. हे प्रकल्प महाराष्ट्राला दिशादर्शक असल्याचे त्यांनी वेळी सांगितले.

गडाख म्हणाले, की हिवरेबाजार येथे विविध कामे झाली. त्याचे श्रेय पोपटराव पवार यांना आहे. त्यांचे काम राज्यालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला परिचित झाले आहे. ग्रामीण भागात काम करणारया माणसाने पवार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आदर्श गाव योजनेत समाविष्ट असलेल्या गावांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कामे चालू असून, यापुढेही अशा गावांच्या मागे शासन खंबीरपणे या गावांच्या मागे उभे राहील. विकासासाठी कोणत्याही गावांना निधीची कमतरता पडणार आहे. 

आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती आढावा बैठकित गावांचा सर्वांगीण व सर्वकष विकास, गाव निवडीचे निकष, सध्या सक्रीय असलेली गावे, योजनेतून करावयाची कामे अशा विविध मुद्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आदर्श गाव योजनेत काय बदल करता येतील, त्यामध्ये गावांच्या सोयीसाठी कोणता निधी मिळायला हवा, याबाबत चर्चा झाली. गावांमधील अडचणी, निधी मिळण्यास येणाऱ्या अडथळ्यांबाबत पवार यांनी मंत्री गडाख यांच्याशी चर्चा केली. विकासासाठीच्या कामासाठी कोणालाही निधीची कमतरता पडणार नाही, असे आश्वासन गडाख यांनी या वेळी दिले. प्रत्येक गावात पडलेले पाणी तेथेच जिरले पाहिजे. गावातील पाणीपातळी वाढली पाहिजे, आदर्श गाव होण्यासाठी दारुबंदी, कुऱ्हाडबंदी आदींचा अवलंब करण्याबाबत पवार यांनी काही अनुभव सांगितले. हिवरेबाजारसारखेच अनेक गावे आदर्श होऊ शकतील. त्यासाठी शासनपातळीवर ठोस प्रयत्न करण्याची गरज असून, विशेष निधीचीही गरज असल्याचे पवार यांनी सांगितले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख