सोनई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज शनिशिंगणापुरला भेट देवून शनिग्रह शांती व तेल अभिषेक करुन स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन घेतले. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्यावर राजकीय कारणातून चिखलफेक झाली. आता काही अंशी अडचण दूर झाली आहे. आता त्यांनी शनिदरबारात येऊन अभिषेक केला.
रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. शर्मा यांनी हे आरोप घेतल्यानंतर वातावरण शांत झाले. या सर्व घडामोडींत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांनी मात्र त्यांची पाठराखण केली. हे सर्व प्रकरण शांत झाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
वंजारवाडी (ता. नेवासे) येथील संत वामनभाऊ सप्ताह सोहळ्यातील पुरस्कार वितरण कार्यक्रमास जाताना त्यांनी शनिशिंगणापुरला भेट दिली. त्यांनी उदासी महाराज मठात अभिषेक करुन दर्शन घेतले. या वेळी पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने व प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते उपस्थित होते. आज दुपारी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दर्शनाचा लाभ घेतला.
देवस्थान ट्रस्टच्या जनसंपर्क कार्यालयात युवानेते उदयन गडाख यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व प्रसाद देवून सन्मान केला. या वेळी विश्वस्त समितीचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, चिटणीस अप्पासाहेब शेटे, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे उपस्थित होते.
येथील दर्शनाने आत्मिक समाधान लाभले असून, मनाला उर्जा प्राप्त झाली आहे, असे मुंडे यांनी सांगितले.
अशीही गळाभेट
मंत्री मुंडे आपल्या वाहनातून मंदिराकडे जात असताना कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मोटारीतून उतरताच त्यांनी युवानेते उदयन गडाख यांची गळाभेट घेत स्वागताचा स्विकार केला.
हेही वाचा..
उदयन गडाखांमुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी
सोनई : घोडेगाव (ता. नेवासे) येथील जनावरांच्या बाजाराला युवा नेते उदयन गडाख यांनी भेट दिली. शेतकरी व व्यापाऱ्यांनी त्यांच्यापुढे समस्यांचा पाढा वाचला. त्यांनी संबंधितांना सूचना करताच शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला.
नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात भरणारा जनावरांचा आठवडे बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. येथे सुरू केलेल्या कांदालिलावाने अल्पावधीतच विश्वास कमावला. काल शुक्रवारी (ता. 29) गडाख यांनी म्हैस व बैलबाजारात फिरून शेतकरी व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महावीर नहार, सुहास गोन्टे, माजी उपसरपंच संतोष सोनवणे उपस्थित होते.
जनावरे वाहनांत चढविण्यासाठी जादा धक्के, ठिकठिकाणी झालेले खड्डे, बाजारात होत असलेली लुटमार व चोऱ्यांसंदर्भात गाऱ्हाणे ऐकल्यानंतर गडाख यांनी संस्थेचे सचिव देवदत्त पालवे यांना सूचना करून, काही तासांतच हा प्रश्न मार्गी लावला.
Edited By - Murlidhar karale

