अकोले : दगडाला दुग्धाभिषेक करून शेतकऱ्यांनी आज दुधाला दर वाढून मिळावा, यासाठी आंदोलन केले. राज्य व केंद्र सरकारचा निषेध करून शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डाॅ. अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्यभर आंदोलने सुरू आहेत.
अकोले येथील कोल्हार-घोटी मार्गावर दुग्धोत्पादक जमले. या वेळी डॉ. अजित नवले, दशरथ सावंत, महेश नवले, डॉ. संदिप कडलग, विजय वाकचौरे, शांताराम वाळुंज, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, सुरेश नवले, शुभम आंबरे, सुरेश गडाख, सचिन शेटे, दिलीप शेणकर, सोमनाथ नवले, लक्ष्मण नवले, चंद्रकांत नेहे उपस्थित होते. दुधाला प्रति लीटर 30 रुपये दर द्यावा, ही प्रमुख मागणी आंदोलकांची आहे.
दुध पावडर आयात कशासाठी
दुधाची पावडर आयात केल्यामुळे दुधाला मागणी घटते. त्यामुळे भाव गडगडतात. साहजिकच केंद्र सरकारने आयातीचे धोरण मागे घेणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, दुधाला रास्त भाव मिळावा, यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करावे, या प्रमुख मागण्यासाठी राज्यभर अशा प्रकारे आंदोलन करण्याचे केले नियोजन केले आहे. आंदोलनाची ही सुरुवात असून, रोज शेतकरी एकत्र जमून अशा पद्धतीने आंदोलन करणार आहेत. रोज दगडला दुधाचा अभिषेक घालणार आहेत. यापुढेही सरकारला जाग आली नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी या वेळी दिला.
रोज दगडाला अभिषेक घालणार : डाॅ. नवले
डाॅ. अजित नवले म्हणाले, सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. कोरोनामुळे शेतीमालाला भाव मिळत नाही. बांधावर फेकून देण्याची वेळ आली आहे. दुध उत्पादक शेतकरीही मेटाकुटीला आले आहेत. दुधाला प्रतिलिटर 30 रुपये मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर 10 रुपये अनुदान वर्ग व्हायला हवे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. हे आंदोलन कोल्हापूर, सांगली पट्ट्यात हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहे. रोज आंदोलक एकत्र जमणार आहेत. रोज दगडाला दुग्धाभिषेक करणार आहेत.
शेतकरी संतापले
आधीच शेतीमालाला दर मिळत नाही. मुंबई-पुणे येथे पाठविल्या जाणाऱ्या भाजीपाल्याला मर्यादा आहेत. स्थानिक पातळीवर शेतीमाल विकला जात नाही. कोरोनामुळे नागरिक भाज्या खरेदी करीत नाहीत. असे असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप आंदोलकांनी या वेळी केला.
Edited By - Murlidhar Karale

