मुंडे असते तर भाजप-शिवसेना मित्रपक्ष राहिले असते - Memories evoked by Shiv Sena in BJP leader's town | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

मुंडे असते तर भाजप-शिवसेना मित्रपक्ष राहिले असते

मुरलीधर कराळे
शनिवार, 12 डिसेंबर 2020

मुंडे हयात असताना शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष मित्रपक्ष होते. मुंडे यांनी शिवसेनेला कायम सोबत घेऊन एकीने राजकारण केले. त्यांच्या काळात शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्षाचे नाते अतूट राहिल, अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.

नगर : गोपीनाथ मुंडे यांनी केलेले काम महाराष्ट्र विसरला नाही. त्यांच्या काळात शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षाला गोणीही गालबोट लावू शकले नाही. ते आज असते, तर हे दोन्ही पक्ष मित्रपक्ष राहिले असते, असे मत शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये सध्या शिवसेना सत्तेत तर भाजप विरोधी बाकावर असले, तरीही कडवा विरोध बाजुला ठेवून शिवसेनेच्या नेत्यांनी आज दिवंगत भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतिनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले.

नगरमध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, महिला जिल्हाप्रमुख आशा निंबाळकर, नगरसेवक संतोष गेनेप्पा, दत्ता कावरे, अनिल शिंदे, दीपक खैरे आदी नेत्यांनी (कै.) मुंडे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्याविषयीच्या आठवणी जागविल्या.

सातपुते म्हणाले, की लोकोपयोगी उपक्रमांसाठी मुंडे कायम आग्रही असत. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उपक्रम करावेत, असे त्यांचे मत असे. पक्ष वेगळे असले, तरी सामाजिक कामांसाठी सर्वांनी एकत्र यावे. लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पक्षभेद विसरून कार्य करावे, अशी त्यांची शिकवण होती. ते भाजपमध्ये असले, तरीही शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना त्यांनी दुजाभावाची वागणूक दिली नाही. कायम आदराचे स्थान देऊन त्यांनी आपलेसे करून घेतले होते. त्यांचे भाषण मनाला भिडणारे होते. सर्वसामान्यांसाठी ते कायम कार्य करीत राहिले. ते आज असते, तर भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष मित्रपक्ष राहिले असते.

मुंडे हयात असताना शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष मित्रपक्ष होते. मुंडे यांनी शिवसेनेला कायम सोबत घेऊन एकीने राजकारण केले. त्यांच्या काळात शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्षाचे नाते अतूट राहिल, अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मुंडे यांना शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते दैवत मानत होते. आजही त्यांच्या आठवणी शिवसेनेचे नेते विसरले नाहीत. ते हयात असते, तर भाजप - शिवसेनेचे मैत्रीचे संबंध कायम राहिले असते, अशी भावना या वेळी नेत्यांनी व्यक्त केली.

भाजपला महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी कै. मुंडे यांनी केलेली पक्षाची बांधणी कामे आली होती. त्यांना शिवसेनेने तितकीच साथ दिली होती. नगर जिल्ह्यात भाजपच्या पक्षसंघटन वाढीसाठी मुंडे यांनी केलेले काम कार्यकर्ते विसरले नाहीत. दोन्ही  पक्ष एकत्र असताना मुंडे यांनी भाजप व शिवसेना असा भेदभाव केला नाही. त्यांनी कायम दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपले मानले. त्यामुळेच आजही शिवसेना हा भाजपपासून अलिप्त असतानाही मुंडे यांच्या आठवणी शिवसेना विसरली नाही, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख