नगर : शिवसेनेचे उपनेते (कै.) अनिल भैय्या राठोड यांना आज विधानसभेत आदरांजली वाहण्यात आली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळकर यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्यास मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राठोड यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. सर्वसामान्यांचा कार्यकर्ता हरपला, अशा शब्दांत मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.
नगरच्या विकासात मोलाचे योगदान ः झिरवळकर
अनिल भेय्या राठोड यांची खरी ओळख सर्वसामान्यांसाठी काम करणारा नेता. अशी होती. नगरच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. सर्वसामान्यांचा नेता हरपला, अशा शब्दांत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळकर यांनी राठोड यांना श्रद्धांजली वाहिली.
राठोड यांच्या जाण्याने मोठे नुकसान ः ठाकरे
अनिल राठोड यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न तडीस नेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. 25 वर्षे नगरचे आमदार राहून त्यांनी नगरकरांसाठी मोठे योगदान दिले. आमदार असले, तरी सर्वसामान्यांचा फोन आला, तरी ते लगेचच धावून जात. त्यांच्या जाण्याने एक चांगला नेता हरपला, तसेच नगरकरांचे, शिवसेनेचे मोठे नुकसान झाले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदरांजली वाहिली.
सर्वसामान्यांचा नेता हरपला : फडणवीस
अनिल राठोड नगरकरांचे भैय्या होते. खऱ्या अर्थाने ते सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जात. कोणतीही मोठी संस्था, कारखाना हाती नसताना त्यांनी नगरवर 25 वर्षे आमदार म्हणून आपली पकड कायम ठेवली. लाॅकडाऊनच्या काळात त्यांनी अन्नछत्र सुरू करून गरीब जनतेला आधार दिला, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.
ते खूप लोकप्रिय होते : थोरात
अनिल भैय्या खूप लोकप्रिय होते. नगरकरांच्या तोंडी कायम भैय्या असे नाव असायचे. 25 वर्षे आमदार होते, पण ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे राहत. गरीब कुटुंबातून आलेले आणि राजकारणाचा कोणताही वारसा नसताना त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर लोकप्रियता मिळविली, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राठोड यांना श्रद्धांजली वाहिली.

