केंद्रीय कृषीमंत्री चाैधरी यांच्यासह फडणवीस हजारेंच्या भेटीला, बंद खोलीत चर्चा - Meeting of Fadnavis Hazare with Union Agriculture Minister Chaidhary, closed door discussion | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्रीय कृषीमंत्री चाैधरी यांच्यासह फडणवीस हजारेंच्या भेटीला, बंद खोलीत चर्चा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

हजारे यांनी सन २०१८ च्या रामलिला मैदानावरील व सन २०१९ च्या राळेगणसिद्धीतील उपोषण आंदोलन केले होते. त्यावेळी पंतप्रधान कार्यालय व केंद्रिय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी लेखी आश्वासन दिले होते.

राळेगणसिद्धी : शेतकऱ्यांच्या प्रश्नी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण उद्या (ता. ३०) येथे सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय कृषिराज्यमंत्री कैलास चौधरी व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दुपारी सव्वातीन वाजता राळेगण सिद्धीत दाखल झाले. हजारे यांची भेट घेऊन त्यांनी बंद खोलीत चर्चेला प्रारंभ केला आहे.

हजारे यांनी सन २०१८ च्या रामलिला मैदानावरील व सन २०१९ च्या राळेगणसिद्धीतील उपोषण आंदोलन केले होते. त्यावेळी पंतप्रधान कार्यालय व केंद्रिय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी लेखी आश्वासन दिले होते. परंतु केंद्र सरकारने आश्वासनाची अमंलबजावणी केली नाही. त्यामुळे स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळावा, केंद्रिय कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तत्ता मिळावी यासाठी हजारे यांनी ता. ३० जानेवारीपासून उपोषण आंदोलनाचा इशारा दिला होता.

कृषिमंत्री चौधरी यांच्या समवेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार गिरीश महाजन, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार बाबुराव पाचरणे, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले आदी उपस्थित आहेत.

गेल्या महिनाभरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार गिरीश महाजन, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार डॉ. भागवत कराड आदींनी हजारे यांची भेट घेऊन त्यांचे मनधरणी केली होती.  परंतु चर्चा नको, केंद्र सरकारने ठोस कार्यवाही करावी असे सांगत हजारे हे उपोषणावर ठाम होते.
 

हेही वाचा..

श्रीराम मंदिर निधीसंकलनास देवळाली प्रवरा येथे प्रारंभ 

राहुरी : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी निधीसंकलनाचा प्रारंभ तालुक्‍यातील देवळाली प्रवरा येथे उत्साहात झाला. जमा झालेल्या सात लाख वीस हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उद्धव मंडलिक महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. देवळालीकरांनी निधीसंकलनात मनोभावे उतरावे, असे आवाहन उद्धव महाराजांनी या वेळी केले. 

देवळाली प्रवरा येथे श्रीराम मंदिरात पावती पुस्तकाचे पूजन करून, निधीसंकलनास प्रारंभ करण्यात आला. उद्धव मंडलिक महाराज, जिल्हा संघचालक भरत निमसे, राजेंद्र भुजाडी, तनपुरे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, ज्येष्ठ नेते सीताराम ढूस उपस्थित होते. माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी एक लाख 71 हजार, आदर्श नागरी पतसंस्थेतर्फे एक लाख अकरा हजार एकशे अकरा, अमोल कन्स्ट्रक्‍शन्सतर्फे एक लाख, अजित चव्हाण यांच्यातर्फे एक लाख, नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यातर्फे एक लाख ऐंशी हजार, नगरसेविका सुजाता कदम यांच्यातर्फे पंचवीस हजार, संगीता चव्हाण- एकवीस हजार, सोपान भांड- अकरा हजार, नगरसेवक भारत शेटे- अकरा हजार, अशा सात लाख वीस हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उद्धव महाराजांकडे सुपूर्द करण्यात आला. 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख