The mayor of Jamkhed did successful politics, maintained power | Sarkarnama

याला म्हणतात राजकारण ! सत्ता टिकविण्यासाठी जामखेडच्या नगराध्यक्षांनी असा टाकला डाव

वसंत सानप
मंगळवार, 16 जून 2020

राजकारणात कधी काहीही घडू शकते, हेच यानिमित्ताने पहायला मिळाले. नेत्यापेक्षा कार्यकर्ते काहीसे मुरब्बी आणि सरस कसे ठरतात, याचे चित्र जामखेडकरांनी प्रत्यक्ष अनुभवले.

जामखेड : जामखेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यासह इतर नगरसेवकांनी सव्वा वर्षातच पहिल्यांदा राष्ट्रवादीतून  भाजपात, तर पुढे तीन वर्षानंतर पुन्हा भाजपातून राष्ट्रवादीची वाट धरली आहे. पहिल्यांदा मिळविलेली खुर्ची व पुन्हा खुर्चीसह सत्ता टिकवण्यासाठी टाकलेली पावलं सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरले आहेत.

राजकारणात कधी काहीही घडू शकते, हेच यानिमित्ताने पहायला मिळाले. नेत्यापेक्षा कार्यकर्ते काहीसे मुरब्बी आणि सरस कसे ठरतात, याचे चित्र जामखेडकरांनी प्रत्यक्ष अनुभवले. येथील नगर पालिकेच्या राजकारणात दुसऱ्यांदा होत असलेले सत्तांतर येथील राजकीय इतिहासाचे पान ठरणार आहे. आणि त्यात घायतडक यांचे नाव हिरो म्हणून घेतले जाईल. त्यांना साथ देणाऱ्या  'त्या' दहा नगरसेवकांचाही त्यात समावेश राहिल.

असे झाले होते नगराध्यक्ष

निखिल घायतडक राजकारणातील कोरी पाटी, सर्वसामान्य कुटुंबातील तरुण कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक झाला. त्याच दरम्यान नेत्यावरील प्रेम आणि निष्ठा व्यक्त करताना धस समर्थक कार्यकर्त्यांसाठी तालुक्यातील एक ग्रामपंचायतीच्या राजकीय भांडणात अडकले. गुन्हा दाखल झाला आणि कोंडीत सापडले. त्यामुळे तब्बल वर्षभर कुटुंबासह नगर पालिकेच्या कार्यक्षेत्रापासून त्यांना दूर राहावे लागले. या काळात आलेल्या व्यक्तीश: अडचणींमुळे परेशान झाले होते. दरम्यान,  नगरपालिकेच्या राजकारणातही तत्कालीन मंत्री राम शिंदे विरुद्ध माजी मंत्री सुरेश धस यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू होता. त्यामुळे नगरपालिकेत धस समर्थक पदाधिकारी-नगरसेवकांची अडवणूक व राजकीय कोंडी करण्याची एकही संधी मंत्री शिंदे यांनी सोडली नाही. या कुरघोडीच्या राजकारणात कार्यकर्ते अधिक अडचणीत आणि शहर विकासापासून दूर राहिले. ही'कोंडी फुटली, ती पक्षांतराने. आणि नगरपालिकेतील सत्तातांराने. घायतडक यांच्यासह नऊ नगरसेवकांनी मंत्री शिंदे यांचे नेतृत्व स्विकारले आणि सत्तेत सहभाग नोंदविला. अडीच वर्षानंतर नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आणि आपोआपच या प्रवर्गातून निवडून आलेल्या घायतडक यांनी नगराध्यक्षपदासाठी प्रबळ दावा  केला. आणि माजी मंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दुसरे नगराध्यक्ष होण्याचा 'मान' घायतडक यांना मिळाला. याच वेळी वर्षभर अडकलेल्या राजकीय भांडणातून निर्माण झालेल्या संघर्षाच्या जोकडातून घायतडकांची सुटका झाली. पिढा हटली. साडेसाती सुटली. घायतडक नगराध्यक्ष झाले. तेही बिनविरोध !.

सत्ताधाऱ्यांकडून झालेली कोंडी

दोन वर्षे लोटले. विधानसभा निवडणूक झाली. मंत्री शिंदे पराभूत झाले. रोहित पवार आमदार झाले. राज्यात ही सत्तांतर झाले आणि पुन्हा सत्तेच्या विरोधात नगरपालिकेचा गाडा हाकताना  दमछाक होत असल्याचे घायतडक यांनी अनुभवले, मात्र शिंदे यांच्याशी जुळलेल्या सुतामुळे त्यावर मात करणे, हाच पर्याय राहिला.पहिला झटका नगरपालिकेला बसला तो उजणी लाभक्षेत्रातून मंजूर झालेल्या १०७ कोटी रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा. याकरिता लागणारी काही रक्कम नगरपालिकेने भरली, मात्र हे काम अन्य एजन्सीच्या नावे टाकले गेले आणि पहिली राजकीय कोंडी झाली.

कोणी सोडले होते ते फर्मान

पुढे घायतडक यांना राजीनाम्याचे फर्मान माजी मंत्री शिंदे यांनी सोडल्याचे बोलले जाते. याबाबत मात्र शिंदे यांनी अद्यापही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा नाट्य लांबणीवर पडले. मात्र कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या दरम्यान पुन्हा ते उफळून आले. निमित्त होते नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे पोलिस विभागाकडून दाखल झालेल्या गुन्ह्याचे  राजकीय भांडवल करुन हा गुन्हाच राजकीय द्वेषातून दाखल झाला आहे, असा अरोप घायतडक यांनी पत्रकार परिषद घेऊन करावा, असे त्यांच्या श्रेष्ठीकडून फर्मान सुटले. मात्र घायतडक यांनी असे करण्यास असमर्थता दर्शविली. आणि  येथूनच पुन्हा घायतडक यांच्या राजीनामा नाट्याचा आगडोंब पुन्हा उसळला. तो ऐवढा तीव्र होता, की त्यात घायतडकांची निष्ठा व पक्षप्रेम जळून खाक झाले. राजीनामा देण्याचे फर्मान पहिल्या टप्प्यात पोहचले पुन्हा तुमचा आणि पक्षाचा काही एक संबंध नाही, असेही सूनवण्यात आले.

असा टाकला डाव

राजकारणात ऐकाकी पडलेल्या घायतडकांनी प्रथम राजीनामा नाट्य हाती घेऊन वेळ मारुन नेली. मुरब्बी राजकारण करीत सर्वांचे अंदाज चुकवित गुगली टाकली. सत्ता टिकविण्यासाठी लागणारे संख्याबळ बरोबर घेऊन थेट पक्षांतराचीच घोषणा केली. त्यामुळे माजी मंत्री शिंदे यांचा नगरपालिकेच्या सत्तेतील 'त्रिफळा'च उडला आणि आमदार रोहित पवारांच्या 'दारी' सत्तेची सूत्रे जाऊन धडकली. राजकारणात माहिर असलेल्या आमदार रोहित पवारांकडून चालून आलेली सत्तेची संधी  दुर राहिली तर नवलच. दोन दिवसात नगराध्यक्ष घायतडक यांच्यासह दहा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आणि आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देऊन त्यांच्या निर्णयाचे स्वागत करीत पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दिला आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख