मराठा आरक्षण ! खटल्याबाबत सरकारने काळजी घेतली होती : थोरात - Maratha reservation! The government was concerned about the lawsuit: Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आरक्षण ! खटल्याबाबत सरकारने काळजी घेतली होती : थोरात

मुरलीधर कराळे
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

मराठा आरक्षणाबाबत सरकारने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले आहेत. यात आता पुढे कसे जायचे, ते सरकार ठरवित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्षाशी बोलले आहेत.

नगर : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात खटल्यात आपण शासन म्हणून पूर्ण काळजी घेतली होती. स्थगितीचा विषयच नसताना न्यायालयाने हा निकाल दिला. हा निर्णय अनाकलनीय आहे. यात पुढे कसे जायचे, हे सरकार ठरवित आहे, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजातील कार्यकर्ते चिडले आहेत. पुढील आठवड्यात थोरात यांच्या घरावर मोर्चा नेण्याचे नियोजन समाजातील कार्यकर्त्यांनी केले आहे. याबाबत बोलताना थोरात म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकारने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले आहेत. यात आता पुढे कसे जायचे, ते सरकार ठरवित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्षाशी बोलले आहेत. न्यायालयात कशा प्रकारे बाजू मांडायचीय, याबाबत चर्चा सुरू आहे. राज्य सरकार सर्व पर्यायांचा विचार करीत आहे. 

महाराष्ट्राला बदनाम केले जातेय

थोरात म्हणाली, की राज्यातील वातावरण पाहता महाराष्ट्राला आणि सरकारला बदनाम करण्याचे काम होत आहे. याला महाराष्ट्राने सक्षमपणे तोंड दिले पाहिजे. काही विषयांत राजकारण करणे योग्य नाही. निवडणुकीला अद्याप चार वर्षे बाकी आहेत. असे असताना अनेकांना काय घाई झाली, ते मला माहित नाही. 

दरम्यान, विधानपरिषदेच्या 12 जागांची नावे आम्ही लवकरच पाठवू. पण राज्यपालांनीही ती नावे लगेच मंजूर करावी, असेही थोरात यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख