Many reached the village for fear of hotspots in the city, but even there ... | Sarkarnama

नगरमध्ये हाॅटस्पाॅटच्या भितीने अनेकांनी गाठले गाव, पण तेथेही...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 जून 2020

शहरातून आलेल्या नागरिकांकडे ग्रामस्थ शंकेने पाहत आहेत. आपल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, म्हणून काळजी घेत आहेत. विशेषतः मुंबई, पुण्यातून आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी सरपंच, तलाठी आवर्जुन पुढे येत आहेत.

नगर : शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढच होत आहे. रोजचे अहवाल धडकी भरणारे आहेत. नगर शहरातील आता कोणताच भाग सुरक्षित राहिला नाही, अशी स्थिती आहे. कोरोना, लाॅकडाऊन, हाॅटस्पाॅट हे शब्द आता लोकांच्या नित्याचे बनले आहेत. शहरातील कोणत्याही भागात केव्हाही रुग्ण सापडू शकतात, त्यामुळे हाॅटस्पाॅटच्या भितिने अनेक शहरवासी खेडेगावांमध्ये जात आहेत. अंतरजिल्ह्यातून आल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसली, तरी तेथील ग्रामस्थांना मात्र धडकी भरते आहे.

शहरातून आलेल्या नागरिकांकडे ग्रामस्थ शंकेने पाहत आहेत. आपल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, म्हणून काळजी घेत आहेत. विशेषतः मुंबई, पुण्यातून आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी सरपंच, तलाठी आवर्जुन पुढे येत आहेत. 

काल आढळलेल्या रुग्णांपैकी नगर शहरातील केडगाव, गजानन काॅलनी, रेल्वेस्टेशन या नवीन भागातील रुग्णांचा समावेश आहे. तसेच राहाता तालुक्यातील रुग्णांचाही समावेश आहे. हाॅटस्पाॅट केलेला व त्या परिसराच्या जवळच्या भागातील लोक इतर भागात जातात. त्यामुळे रुग्ण वाढू लागले आहे. ही साखळी तुटण्याएेवजी वाढतच असल्याने शहरातील नागरिकांना चिंतेचा विषय झाला आहे.

सध्या जिल्ह्यात एकूण 239 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी महापालिका क्षेत्रात 54, जिल्ह्यातील 124, तर इतर जिल्ह्यातून आलेले 50, इतर राज्यातून आलेले 3, बाहेरच्या देशातून आलेले 8 यांचा समावेश आहे. आतापर्यंत 3231 जणांची स्त्राव तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी अद्याप 62 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. यापूर्वी बरे होऊन घरी गेलेले रुग्णांची संख्या 167 आहे, अशी माहिती आरोग्य यंत्रणेने दिली.

नगरच्या जिल्हा रुग्णालयात स्त्राव तपासणीची व्यवस्था झाल्यामुळे तपासण्या झटपट होऊ लागल्या आहेत. शिवाय अहवालही लवकर मिळून रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना ताब्यात घेणे सोपे झाले आहे. यापूर्वी पुण्यास स्त्राव पाठविला जात होता. तेथून येण्यास किमान दोन-तीन दिवसांचा कालावधी लागत होता. त्यामुळे रुग्णांची बाधा वाढण्यास वाव होता. तथापि, आता मात्र अहवाल आल्याबरोबर प्रशासन संबंधित रुग्णाच्या घरी जावून इतरांनाही ताब्यात घेत आहेत. त्यामुळे कोरोना पसरण्यास काही प्रमाणात ब्रेक मिळत आहे. 

तरीही बाजारपेठेत मोठी गर्दी

कोरोनाची धास्ती असली, तरी बाजारपेठेत मात्र ग्राहक कोरोनाला घाबरत नाही. खरेदी करताना कोणत्याही नियमांची अंमलबजावणी न करता लोक रस्त्यावर उतरत आहेत. सहा फूट अंतर ठेवणे आवश्यक असताना त्याचे कोणालाही भान नाही. मास्क मात्र बहुतेकांच्या तोंडाला दिसतात. दुकानदारांकडूनही सॅनिटायझरचा वापर होताना दिसत नाही. विशेषतः भाजीबाजारात तर कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे कोरोना वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख