महिला सक्षमीकरणासाठी नितीन गडकरी यांनी दिला हा मंत्र

महात्मा गांधींच्या विचारांतून प्रेरणा घेऊन ग्रामीण, कृषी या सारख्या क्षेत्रात खादी उद्योग, अगरबत्ती उद्योग, पश्मिना शॉल, सोलर चरखा, खादी घड्याळ अशा नवनवीन नाविन्यपूर्ण कल्पना आम्ही उद्योगांमध्ये राबवित असून, त्यासाठी स्थानिक महिलांना प्रशिक्षण दिले जाते.
nitin gadkari.jpg
nitin gadkari.jpg

संगमनेर : महिला उद्योजकांसाठी सरकारच्या विविध योजना समजावून घेवून, महिलांनी उद्योगात येणे गरजेचे आहे. देशाचा विकास हा उद्योगावरच अवलंबून असतो. दृष्टीकोन बदलण्यासाठी तज्ज्ञ, अनुभवी व यशस्वी लोकांकडून मार्गदर्शन घेतल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. प्रशिक्षण देखील अतिशय महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहनमंत्री व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितिन गडकरी यांनी केले.

येथील स्त्री उद्यमी फाउंडेशन, स्वयंशक्तीद्वारे व्हिडीओ कॉन्फरन्स ज्ञान मालिका व्याख्यान मालिकेत ते बोलत होते. ते म्हणाले, स्थानिक लोकांजवळील कला हेरून तेथील कच्च्या मालाची उपलब्धता, हवामान, गुणवत्ता बघून व्यवसाय सुरु करा. गुणवत्तेच्या बाबतीत कधीही तडजोड करू नका. गुणवत्ता, चांगले पॅकेजिंग व मार्केटिंग यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली आहे. महात्मा गांधींच्या विचारांतून प्रेरणा घेऊन ग्रामीण, कृषी या सारख्या क्षेत्रात खादी उद्योग, अगरबत्ती उद्योग, पश्मिना शॉल, सोलर चरखा, खादी घड्याळ अशा नवनवीन नाविन्यपूर्ण कल्पना आम्ही उद्योगांमध्ये राबवित असून, त्यासाठी स्थानिक महिलांना प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत 80 लाख महिला जोडल्या गेल्या असून, दोन कोटी महिला उद्यमींना जोडण्याचा संकल्प आहे. यासाठी आपल्यासारख्या महिलांनी प्रयत्न केल्यास ते सहज शक्य आहे, असेही ते म्हणाले.

आपल्याकडे कला आहे पण महिलांना एक्सपोजर मिळत नाही तेव्हा सरकारी योजनांचा फायदा घ्या व स्वतःचा व त्याचबरोबर देशाच्या विकासास मदत करा. सरकार महिलांना अनुदान देण्यास नेहमीच तयार आहे. पंतप्रधानाच्या योजनेअंतर्गत आपल्याला काहीही तारण ठेवावे लागत नाही. जवळजवळ पाच हजार कोटी रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. आयात करणे टाळता येण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत असे सांगत, लघुउद्योगात काम करणाऱ्या महिलांना मदत करण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, गडकरी यांनी स्त्री सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती दिली. आगामी काळात महिलांनी पुढे यावे. उद्योग उभारावेत, केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. बॅंका, जिल्हा उद्योग केंद्र यांच्या माध्यमातून अनेक योजना आहेत. घरगुती वापराच्या वस्तू, पदार्थ बनविण्यासाठी विशेष प्रशिक्षणही दिले जाते. अशा प्रशिक्षणाचा लाभ घेऊन महिलांनी आपल्या कुटुंबाला आधार देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या आॅनलाईन व्याख्यानासाठी राज्यातून अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.

Edited By - Murlidhar karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com