नगर : भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत दाखल झालेले आणि स्थायी समितीचे बिनविरोध सभापती झालेल्या मनोज कोतकर यांनी आजच पदभार स्विकारला. परंतु भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावली असून, ते अधिकृत राष्ट्रवादीत राहिल्यास त्यांचे नगरसेवकपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सभापतीपद औटघटकेचेच राहण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेचे स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांना भाजपचे शहराध्यक्ष महेंद्र गंधे यांनी "कारणे दाखवा' नोटीस बजावली. ते कोणत्या पक्षात आहेत, हे आगामी तीन दिवसांत जाहीर करण्यास सांगून, कारवाई करण्याची तंबी नोटिशीत दिली आहे.
नोटिशीत म्हटले आहे, की आपण भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य आहात व नगर महापालिकेच्या 2018च्या निवडणुकीत आपण भाजपतर्फे प्रभाग क्रमांक 17 मध्ये सर्वसाधारण जागेवर निवडून आलात. मतदारांनी आपणास मतदान करताना भाजपचे उमेदवार आहात म्हणून निवडून दिले आहे. भाजपचे नगरसेवक म्हणून गटनोंदणी केलेली आहे. त्यामुळे भाजपचे नगरसेवक म्हणून पक्षाच्या हिताविरुद्ध कोणताही निर्णय घेण्याचा आपणास कायदेशीर हक्क व अधिकार नाही, याची आपणास पूर्ण कल्पना आहे. महापालिकेत नुकतीच स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक झाली. त्यात आपण अर्ज भरून बिनविरोध निवडून आलात. आपण भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे समजते. सभापतिपदी आपली नेमणूक ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून झाल्याचे कळते. त्याबाबतचा खुलासा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना व शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांना लोक विचारत आहेत. आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे स्थायी समिती सभापतिपदाचे उमेदवार होतात का, तसेच आपण भाजपचा राजीनामा दिला आहे का? याबाबत तीन दिवसांत खुलासा करावा. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटिशीत म्हटले आहे.
दरम्यान, मनोज कोतकर यांनी आज स्थायी समितीचे सभापतिपद स्वीकारल्यावर पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. यावर कोतकर यांनी चलाखपणे, "कोरोना संकटात शहरातील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्याला मी प्राधान्य देईन. जनतेच्या प्रश्नांसाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवावे लागते.
इकडे आड, तिकडे विहिर
कोतकर यांनी भाजप सोडल्यास त्यांचे नगरसेवकपद धोक्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे सभापतीपदही धोक्यात येईल. आणि पुन्हा भाजपचे कमळ हाती घ्यायचे असल्यास त्यांना राष्ट्रवादी व शिवसेनेच्या रोषास सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार असल्याच्या कारणानेच शिवसेनेने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे शिवसेना असे होऊ देणार नाही. महाआघाडीचा धर्म पाळण्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित होणार आहे. त्यामुळे कोतकर यांची `इकडे आड, तिकडे विहिर` अशीच स्थिती झाली आहे.

