नगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडीसाठी भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले व बिनविरोध निवडून आलेले मनोज कोतकर हे राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्येच असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले आहे. त्यामुळे भाजपच्या चिन्हावर निवडून येऊन नगरसेवक झालेल्या कोतकर यांच्यावर भाजप काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.
कोतकर कोणत्या पक्षाचे, याबाबत गेल्या तीन दिवसांपासून खल सुरू होता. स्थायी समितीच्या सभापती निवडीसाठी कोतकर यांनी भाजमधून अचानक राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी अर्ज भरला. हे सर्व अचानक झाल्याने भाजपला उमेदवार देता आला नाही. महाविकास आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात आपला उमेदवार नको, म्हणून शिवसेनेने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे कोतकर बिनविरोध सभापती झाले. यानंतर कोतकर आपल्याच पक्षात असल्याचे काही भाजप नेत्यांनी सांगितले. तसेच कोतकर यांना अधिकृतपणे नोटीस देऊन त्यांची भूमिका विचारली आहे. तीन दिवसांचा वेळ दिला असून, भाजपमध्ये नाही, असे उत्तर आल्यास भाजप कारवाई करणार आहे.
दरम्यान, सभापतीचा पदभार घेताना कोतकर यांनी पक्षात प्रवेशाबाबत बोलण्याचे टाळले. त्यामुळे ते नेमका कोणत्या पक्षात आहेत, याबाबत संभ्रमच राहिला. आज मात्र राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी कोतकर यांच्याबाबत आपली भूमिका माध्यमासमोर बोलताना व्यक्त केली. मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीचा पंचा घातला म्हणजे ते आता राष्ट्रवादीचेच आहेत. राष्ट्रवादीकडूनच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता संभ्रम होण्याचे कारण नाही, असे जगताप यांनी स्पष्ट केले.

